सरकारी कार्यालये, बँकांची कामे ठप्प
केंद्र व राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी, खासगी क्षेत्रातील असंघटीत कामगारांच्या संपाचा जिल्ह्य़ातील सरकारी व आर्थिक कामांवर चांगलाच परिणाम झाला. या सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या. कर्मचारी-कामगारांचा मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. येथे निदर्शने करीत या संघटनांनी जोरदार घोषणेबाजी केली.
सकाळी गांधी मैदानातून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांनी केले. सभेत बोलताना त्यांनी राज्य व केंद्र सरकारला जोरदार इशारा दिला. संपाबाबत कर्मचाऱ्यांनर कारवाई करण्याआधी दोन्ही सरकारांनी आगामी निवडणुकांचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच खासगी क्षेत्रातील असंघटीत कामगारही या मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. जिल्ह्य़ातून त्यासाठी कामगार येथे आले होते. राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनीही संपात सहभाग घेऊन केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला. जिल्हा स्तरावरील सर्व कार्यालयांमध्ये संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. नगरची महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक एम्प्लॉईज असोशिएशन आदी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांसह अंगणावाडी, घरेलू कामगार, ग्राम
रोजगार, परिचारिका अशा विविध
विभागांमधील कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात कर्मचारी, कामगारांचा मोठा सहभाग असल्याने जिल्हाधिकारी
कार्यालयावर प्रचंड गर्दी झाली. जिल्हाधिकाऱ्यांकडील विविध बैठकांवरही त्याचा परिणाम झाला.
सरकारी कार्यालये व बँकांमध्ये आज कोणत्याच स्वरूपाची कामे झाली नाहीत. काल या कार्यालयांना शिवजंयतीची सुट्टी होती, आज व उद्या संप असल्याने ही कामे पुर्णपणे ठप्प झाली आहेत.
मनपाचे कर्मचारी संपात सहभागी असल्याने पहाटेपासुनच त्याचे परिणाम शहरात जाणवू लागले. शहरात आज साफसफाईची कामे झालीच नाहीत. पोस्टल कर्मचारी संघटना तसेच बीएसएनएल मधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. राज्य शिक्षक परिषदेने काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा दिला.
श्रीरामपूरला बँका, कार्यालये ओस
शहरात कामगार संघटनांच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील बँका, टपाल सेवा व विमा कंपन्यांची कार्यालये बंद होती. तालुक्यातील जिल्हा अंगणवाही सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका या संपात सहभागी झाल्या होत्या. उद्याही बंद सुरूच राहणार आहे.
कर्जतमध्ये अल्प प्रतिसाद
आज देशभर विविध कामगार संघटनानी विविध मागण्यासांठी पुकारलेले बंद कर्जत तालुक्यात तरी बारगळल्याचे दिसून आले. अनेक सरकारी विभागातील सर्व कर्मचारी कामावर हजर होते. तालुक्यात सर्व कामगार संघटना सहभागी होणार होत्या. प्रत्यक्षात वनविभाग मिरजगाव व कर्जत येथील सर्व कर्मचारी कामावर हजर होते. या शिवाय सामाजिक वनीकरण, मांडओहळ मिरजगांव, सीना प्रकल्प निमगांव गांगर्डा, कृष्णा खोरे अजंर्गत येणारे कोळवडी कार्यालय, सावर्जनिक बांधकाम विभाग, तालुका कृषी कार्यालय, या सर्व कार्यालयात सर्व कर्मचारी कामावर हजर होते.
महसुल विभागातील प्रातंकार्यालय मात्र पुर्णपणे बंद होते. याशिवाय तालुक्यातील महसुल विभागातील ७० पैकी ५७ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. पंचायत समितीच्या १ हजार १७७ पैकी १ हजार १६ कर्मचारी कामावर हजर होते, शाळाही सुरू होत्या.