अपुऱ्या पावसामुळे राज्याच्या बहुतांश भागातील पाणवठे कोरडे पडले असून, उरलेले जलाशयही लवकरच कोरडे पडण्याची शक्यता आहे. भीमा नदीवरील उजनी धरणात मात्र इतर धरणांच्या तुलनेत मृत साठा बराच जास्त शिल्लक राहात असल्याने इतर ठिकाणचे स्थलांतरित पक्षी या जलाशयावर गोळा होण्याची शक्यता आहे.
पुणे व सोलापूर जिल्ह्य़ांच्या सीमेवर उजनी धरण आहे. त्याचा जलाशय हा स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदनवन ठरला आहे. तिथल्या पाणथळीत रोहित (फ्लेमिंगो), ओपन बिल स्टॉर्क, चित्रबलाक, शराटी असे विविध प्रकारचे करकोचे, स्पून बिल, ग्रे हेरॉन, पर्पल हेरॉन असे विविध बगळे, कॉमन सॅन्डपायपर (चिखल्या), अनेक प्रकारची बदके, विविध प्रकारचे गल्स येतात. हेच पक्षी राज्याच्या इतरही पाणवठय़ांवर येत असतात. मात्र, राज्यात या वर्षी अपुरा पाऊस पडल्यामुळे बहुतांश पाणवठे आटण्याच्या बेतात आहेत. त्यांच्या तुलनेत उजनीतील स्थिती काहीशी वेगळी आहे.
उजनी धरणाचे वैशिष्टय़ म्हणजे हे धरण उथळ असून, ते मोठय़ा क्षेत्रावर पसरलेले आहे. या धरणाचा मृत साठा हा उपयुक्त साठय़ापेक्षाही अधिक आहे. आकडेवारीत सांगायचे तर तब्बल ६३ टीएमसी इतका मृत साठा आहे, तर ५३.६ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. याचाच अर्थ धरणाची दारे उघडून जेवढे पाणी सोडता येते, त्यापेक्षा जास्त पाणी धरणात तळाशी शिल्लक राहते.
सध्या या धरणात सुमारे दोन टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे आणि खाली ६३ टीएमसी मृत साठा आहे. त्यामुळे उपयुक्त पाणी साठा संपला तरी मोठा जलसाठा तसाच शिल्लक राहतो. या पाण्याचा वापर करता आला नाही तरी ते तसेच साचून राहते.
त्यामुळे इतर बरेच स्थलांतरित पक्षी उजनी धरणाच्या विविध पाणवठय़ांवर गर्दी करण्याची शक्यता आहे, असे पक्षीअभ्यासक व भिगवण येथील पाणवठय़ावरील पक्ष्यांचा अभ्यास केलेले डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितले. उजनीच्या निर्मितीनंतर म्हणजे गेल्या ४२ वर्षांमध्ये अशी स्थिती उद्भवली नाही. त्यामुळे या वेळी पक्षी वाढतील. त्याचबरोबर येथे त्यांच्या अन्नासाठी स्पर्धा असल्याने एकूणच पक्ष्यांच्या संख्येवर विपरीत परिणामही होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.         
पुणे-सोलापूर रस्त्यावरील भिगवण या गावाजवळ उजनी जलाशयाचा पाणवठा आहे. तिथे अनेक ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी येतात. ही ठिकाणे पक्षी पाहण्यासाठी उत्तम समजली जातात.