राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार असून देशात भ्रष्टाचार आणि महागाई वाढली आहे. जनता या महागाईमुळे त्रस्त झाली आहे. त्यामुळे देशात भाजपशिवाय पर्याय नाही. भाजप सत्तेवर येणार असल्याने आता बिनबुडाचे आरोप केले जात असून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मॉडेल मिलजवळ पक्षाचे जनसंपर्क कार्यालय स्थापन करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तरांचलचे माजी अध्यक्ष प्रकाश पांजा, शहर अध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, महापौर अनिल सोले, नागो गाणार आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदींच्या रूपात पक्षाने सक्षम नेतृत्व दिले आहे. त्यांच्या व्हिजनमध्ये नितीन गडकरी काम करीत असून त्याला ते समोर नेण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्यावेळी याच ठिकाणी कार्यालय होते. गेल्या वेळी ३० हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र, यावेळी २ लाख ३० हजार मतांनी नितीन गडकरी यांना विजयी करण्यासाठी कार्यकत्यार्ंनी कामाला लागावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.निवडणूक हे युद्ध आहे. यात जो सक्रिय भूमिका निभावतो तोच समोर जातो, असेही कृष्णा खोपडे म्हणाले. यावेळी पक्षाच्या अनेक नेत्यांची भाषणे झाली.