लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर पक्षाने देशपातळीवर सदस्य मोहीम सुरू केली असली तरी उपराजधानीत सदस्य मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्यामुळे सदस्य मोहीम थांबली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी सर्वात जास्त सदस्य तयार करण्याचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या उपराजधानीत मात्र अजूनही मोहीम प्रारंभ न झाल्याने कार्यकर्ते नोंदणीबाबत संभ्रमात आहे.  
भाजपतर्फे देशभर सदस्य मोहीम राबविण्यासाठी आवाहन केल्यानंतर मुंबईमध्ये पंधरा दिवसांपूर्वी या संदर्भात राज्यातील सर्व संघटन मंत्र्याची बैठक झाली. विदर्भातील  सहा जिल्ह्य़ांची जबाबदारी अनिल सोले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात सदस्य मोहीम राबविली असताना नागपुरातून सर्वात जास्त सदस्य तयार करण्यात आले होते. यावेळी विदर्भाला जास्तीत जास्त सदस्य तयार करण्याचे लक्ष्य देण्यात आले असून त्या संदर्भात त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आणि प्रभाग पातळीवर बैठका घेण्यात येत आहेत. विदर्भातील काही जिल्ह्य़ात सदस्य मोहीम सुरू करण्यात आली तरी उपराजधानीत मात्र कैंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत सदस्य मोहीम सुरू करण्याचा शहर पदधिकाऱ्यांचा मानस आहे. मात्र, दोन्ही नेते एकाच वेळी मिळत नसल्यामुळे सदस्य मोहिमेला प्रारंभ करण्यात आलेला नाही. शहराची जबाबदारी शहर अध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे यांच्याकडे देण्यात आली त्यामुळे त्यांनी दोन्ही नेते एकत्र येतील त्यावेळी शुभारंभ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गेल्यावेळी शहरात सर्वात जास्त सदस्य पूर्व नागपुरातून करण्यात आले होते. गेल्यावेळी सदस्य करताना पाच रुपये शुल्क घेण्यात आले होते. मात्र, यावेळी निशुल्क सदस्य मोहीम आहे. सदस्य मोहिमेसाठी ऑनलाईन व्यवस्था पक्षातर्फे करण्यात आली आहे. सदस्य करण्यासाठी प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना लक्ष्य देण्यात आले आहे.
दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू असल्यामुळे नितीन गडकरी यांना वेळ मिळणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सदस्य मोहिमेचा शुभारंभ करावा, अशी काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सूचना केली. मात्र, गडकरी समर्थकांनी त्याला विरोध करीत दोन्ही नेते एकाचवेळी नागपुरात येतील त्याच दिवशी सदस्य मोहिमेचा शुभारंभ करण्यात यावा, अशी सूचना केली. या दोन्ही नेत्यांची वेळ मिळत नाही तोपर्यंत शुभारंभाची वाट पाहावी लागेल. कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.
 यासंदर्भात सदस्य मोहिमेचे पूर्व विदर्भाचे प्रमुख आमदार अनिल सोले यांच्याशी संपर्क साधला असता विदर्भात काही जिल्ह्य़ांत सदस्य मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहराची जबाबदारी शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांच्याकडे असल्यामुळे नागपुरातील निर्णय तेच घेतील.
२९ नोव्हेंबरला नागपुरात शुभारंभ करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, अजून त्याबाबत निर्णय झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp stopped membership campaign due to leaders busy schedule
First published on: 28-11-2014 at 01:30 IST