सिडको वसाहतींमध्ये सध्या पाणी संकट ओढवले आहे. त्याचाच फायदा टँकरचालकांनी घेण्यास सुरुवात केली आहे. हे टँकरचालक पाण्यासाठी येथील नागरिकांची लूट करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. दोन किलोमीटरच्या अंतरासाठी एका टँकरमागे दोन हजार रुपये घेतले जात असून ही लूट थांबविण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

 पनवेल नगर परिषद व सिडको वसाहतींवर सध्या पाणी संकट ओढवले आहे. पावसाच्या पाण्याने धरणे व नदी भरेपर्यंत हे संकट असेच राहणार आहे. मात्र पाणी संकटाच्यावेळी स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी टँकरलॉबी मात्र सज्ज झाली आहे. नवीन पनवेल व कळंबोली येथील सिडकोच्या पाणी टाकीतून ३५० रुपयांना भरलेल्या टॅंकरचे पाण्यासह टँकर भाडे  सोसायटीच्या प्रवेशद्वारापर्यंत जाईपर्यंत दोन हजार रुपये होते.  सोळाशे ते दोन हजार आकारणी टँकरचालकांकडून होते. असे येथील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. सिडकोने वसाहतीमध्ये पाणीटंचाईवेळी टँकरने पाणीपुरवठा केला जाईल असे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. गृहनिर्माण सोसायटीचे प्रतिनिधी सिडकोकडे पाणी कमी दाबाने येत असल्याची तक्रार घेऊन गेल्यावर तेथे (नळ दुरुस्ती करणारा) प्लम्बर पाठविण्याचे आश्वासन वसाहतीमधील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयातून दिले जाते. चार तासांनी प्लम्बर सोसायटीमधील अंतर्गत जलवाहिनी व टाकीची पाहणी करतात. जलवाहिनीमध्ये कचरा असल्यास त्याची साफसफाई केली जाते. तरीही पाणी न आल्यास संबंधित प्लम्बरने दिलेल्या हिरव्या कंदिलाच्या इशाऱ्यानंतर सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संबंधित गृहनिर्माण सोसायटीला पाणीपुरवठा करण्यासाठी याच खासगी टँकरचा आधार घेतात.

नवीन पनवेल व कळंबोली या दोनही वसाहतींना प्रत्येकी २५ टँकर पाणी पुरविले जाते. विशेष म्हणजे आपत्तीवेळी सिडकोची स्वत:च्या मालकीची पाणीपुरवठा करणारी टँकरयोजना अस्तित्वात नाही. त्यामुळे सिडकोने सोसायटय़ांना पाणीपुरवठा टँकरद्वारे करतानाही खासगी टँकरमालकांकडे जावे लागते. वसाहतीमधील प्रत्येक सदनिकाधारकांकडून सेवा कर घेणाऱ्या सिडकोने पाण्यासाठी आपत्तीवेळी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी स्वत:ची टँकर योजना राबवावी, अशी मागणी सामान्यांकडून होत आहे. सध्या पाणीपुरवठा होत नसलेल्या गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये दिवसभरातून किमान दोन टँकर पाण्याची मागणी होत आहे. त्यामुळे महिन्याकाठी तीस ते चाळीस हजार रुपये पाणी बिल भरणाऱ्या सोसायटीला तब्बल सव्वा लाख रुपये देऊन टँकरचे पाणी प्यावे लागते. किमान पन्नास लाख रुपयांचे घर घेणाऱ्या रहिवाशांना आता नवी मुंबई व सिडको वसाहतीमध्ये राहणे नकोसे झाले आहे.  पाणी संपल्यास सिडको प्रशासनाने तक्रार करण्यासाठी आपत्ती योजना आखलेली नाही. पावसाला अजून एक आठवडा लागल्यास पाणीटंचाईसाठी २४ तास तक्रार करण्यासाठी कोणताही दूरध्वनी क्रमांक सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आलेला नाही. या बाबत सिडकोचे अधीक्षक अभियंता एन. आर. निमकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 

पाणीप्रश्नी राजकीय अनास्था

कळंबोली, नवीन पनवेल, खांदेश्वर, खारघर व कामोठे वसाहतीमधील रहिवाशांवर हेच सामूहिक पाणी संकट आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधींनी सिडकोला याचा जाब विचारल्यास प्रत्येक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना वेगवेगळी उत्तरे देऊन रहिवाशांचे आंदोलन परतविण्याची शक्कल सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने लढविली आहे. पनवेलच्या या राजकीय शक्तींनी एकत्रितपणे या सामाजिक संकटाविरोधात सिडकोला जाब विचारण्याची तयारी न दाखविल्यामुळे सिडकोनेही कोणतेही पाण्याचे नियोजन करणे टाळले.