पूर्व उपनगरांतील अनेक नाले गाळाने भरलेले असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध होऊनही नाल्यांची सफाई ९५ टक्के पूर्ण झाली असल्याचा पालिकेचा दावा आहे. रफीकनगर येथील नाल्याच्या काठावर कचऱ्याचे ढीग दिसत असूनही या नाल्याची सफाई झाल्याचा दावा पालिकेचा आहे. तसेच परिसरातून फेकण्यात आलेला कचरा येथे तरंगत असला तरी त्याच्याखालून पाण्याचा प्रवाह सुरळीत सुरू असल्याचे अजब तर्कटही पालिकेने मांडले आहे. कचऱ्याखालून जलप्रवाह सुरू असल्याचा दावा करणाऱ्या पालिकेने मात्र प्रवाहाबरोबर कचऱ्यातील वस्तू पुढे का जात नाहीत, याबाबत सोयिस्कर मौन बाळगले आहे. एप्रिल महिन्यात पालिकेने साफ केलेले नाले पुन्हा गाळाने भरून ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्याचाच प्रत्यय विरोधी पक्षनेत्यांच्या पाहणी दौऱ्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर सुनील प्रभू यांनी नालेसफाईचा दौरा करून समाधान व्यक्त केल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पूर्व उपनगरातील काही नाल्यांची पाहणी केली. तेव्हा अनेक नाल्यांचे काठही कचऱ्याने भरलेले दिसले. मात्र, हे सर्व नाले स्वच्छ केले असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. गोवंडी येथील रफीकनगर नाल्याशेजारी असलेल्या झोपडपट्टीतून कचरा आणून ढकलला जातो. हा कचरा पाण्यावर तरंगत असून या नाल्याची साफसफाई तळापर्यंत केली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
भरती ओहोटीमुळे नाल्यात शिरणाऱ्या समुद्राच्या पाण्यासोबत कचरा व वस्तूही नाल्यात शिरतात. त्यातच झोपडपट्टीतून रोज कचरा टाकला जात असल्यानेही पाण्यावर वस्तू दिसतात. नालेसफाई केल्यावरही या वस्तू दिसत असल्याने नालेसफाई झाली नसल्याचे वाटते. मात्र, प्रत्यक्षात या वस्तूंखाली नाल्याच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत सुरू असतो, असा अजब दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, या पाण्याच्या प्रवाहासोबत या वस्तू पुढे ढकलल्या का जात नाहीत, याबद्दल स्पष्टीकरण देण्यास पालिका विसरली आहे. सतत कचरा टाकल्या जात असल्याने अस्वच्छ वाटणाऱ्या नाल्यांची पुन्हा सफाई केली जाते. नाल्यामध्ये सतत कचरा टाकल्याने निर्माण होणारी ही स्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये, असे आवाहनही पालिकेने केले आहे.