वाढलेले पोट..भल्या मोठय़ा पिळदार मिश्या..अशी पोलिसांची प्रतिमा आता हिंदी चित्रपटसृष्टीतील नायकांमुळे हळूहळू बदलू लागली असून त्याचे परिणाम राज्यातील पोलीस दलातही दिसू लागले आहेत. सुरक्षा व्यवस्थेच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून अधिकारी-कर्मचारी पोलीस ठाण्यातील व्यायामशाळांमध्ये पिळदार शरीरयष्टी बनविण्यासाठी कसरत करत असल्याचे चित्र आहे. याच पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेने राज्यातील पोलिसांसाठी नवे व्यासपीठ निर्माण करत यंदापासून ‘ठाणे वाहतूक श्री’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ जानेवारीला ठाण्यात ही स्पर्धा होणार असल्यामुळे वाहतूक शाखेने स्पर्धेची जय्यत तयारी सुरू केली आहे.
आतापर्यंत पोलीस म्हटले की, भल्या मोठय़ा पिळदार मिश्या..अंगाने जाडजूड..वाढलेले पोट..अशीच प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. हीच प्रतिमा जुन्या मराठी तसेच हिंदी चित्रपटांत पोलिसाची भूमिका बजावणाऱ्या नायकांनीही रंगवली आहे. पण अलीकडच्या सिंघम, दबंग, रावडी राठोड यासारख्या हिंदी चित्रपटांत पोलिसांची भूमिका बजावणाऱ्या अजय देवगण, सलमान खान आणि अक्षयकुमार या नायकांनी पोलिसांची ही प्रतिमा पूर्णपणे बदली असून पोलीस म्हणजे पिळदार शरीरयष्टी असणारी व्यक्ती असे समीकरण रूढ होऊ लागले आहे. त्याचा परिणाम राज्यातील पोलीस दलात होऊ लागला असून पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनीही पिळदार शरीरयष्टी तयार करण्यास सुरुवात केली आहे. आता राज्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बहुतेक पोलीस ठाण्यांमध्ये व्यायामशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पोलिसांना शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते, पण खासगी व्यायामशाळांचे शुल्क महागडे असते. त्यामुळे त्या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी जाणे पोलीस टाळत होते. याच पाश्र्वभूमीवर राज्यातील बहुतेक पोलीस ठाण्यात व्यायामशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातच हिंदी चित्रपटांचा प्रभाव पडल्याने पोलीस अधिकारी-कर्मचारी व्यायामशाळेत जोरदार कसरत करत असल्याचे चित्र आहे.
शहरातील मुख्य चौक तसेच नाक्यांवर कार्यरत असणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर पोलीस दलाची प्रतिमा ठरवली जाते. त्यामुळे या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शरीरयष्टी तंदुरुस्त ठेवावी आणि त्यांनाही व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशातून येत्या वाहतूक सुरक्षा सप्ताहात  ‘ठाणे वाहतूक श्री’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील पोलीस दलासाठी नवे व्यासपीठ खुले करून देण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच तुमचे वाहन तंदुरुस्त असेल तर तुम्ही तंदुरुस्त राहू शकतात, असा नागरिकांना संदेश या स्पर्धेतून देण्याचा हेतू आहे, असेही त्यांनी सांगितले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

 

मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Body building of police
First published on: 18-12-2013 at 09:23 IST