सजविलेला रथ.. टाळमृदुगांचा गजर..‘बाळासाहेब अमर रह ’ अशा घोषणा..ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी..अशा भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी नाशिक येथे गोदावरीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
तत्पूर्वी अस्थिकलशाची शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून सजविलेल्या रथातून यात्रा काढण्यात आली. अस्थिकलश यात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यालयात गुरुवारी दिवसभर  अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. शहरासह जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली. शुक्रवारी सकाळी दहा वाजता मध्यवर्ती कार्यालयासमोर सजविलेल्या रथात अस्थिकलश ठेवण्यात आला होता. अस्थिकलशाच्या दर्शनासाठी नागरिकांची सकाळी कार्यालयाजवळ गर्दी झाली होती. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी येथे जमा झाले होते. सकाळी काहीकाळ रथावर जाऊन अस्थिकलशाचे दर्शन पदाधिकारी व नागरिकांनी घेतले. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी रथ सजविण्यात आला होता. ‘बाळासाहेब अमर रहे’ या फलकासह बाळासाहेबांची भव्य प्रतिमा लावण्यात आली होती. प्रतिमेसमोर अस्थिकलश ठेवण्यात आला होता. रथापुढे भजनी मंडळाने टाळमृदुंगांचा ताल धरला होता. रथापुढे  शाळकरी विद्यार्थी व त्यांच्यामागे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेला जनसमुदाय असे दृश्य पाहाावयास मिळाले. मध्यवर्ती कार्यालयापासून सुरु झालेली अस्थिकलश यात्रा पुढे शालिमारमार्गे गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, अहिल्याबाई होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड या मार्गावरुन पुढे गोदातीरी यात्रेचा शेवट झाला. अस्थिकलश यात्रेच्या रथावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. यात्रा मार्गात विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षाच्या वतीने  श्रध्दांजली वाहणारे फलक लावण्यात आले होते. बाळासाहेबांच्या आठवणींनी व्याकूळ शिवसैनिक यावेळी अश्रृ ढाळताना दिसत होते. पोलीस तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून यात्रेची सर्व व्यवस्था पाहण्यात येत होती. सर्वाना शांततेचे आवाहन करण्यात येत होते. अस्थी विसर्जनासाठी रामकुंडावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. माजी महापौर विनायक पांडे, जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, सुनील बागुल यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. दरम्यान, यात्रेमुळे रामकुंडावर येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल होते. यात्रेत खा. हरिश्चंद्र चव्हाण, अनिल कदम, दादा भुसे, बबन घोलप, वसंत गीते, अ‍ॅड. उत्तम ढिकले, हे सर्व आमदार तसेच अतुल चांडक, महापौर यतिन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, अर्जुन टिळे, काँग्रेस शहराध्यक्ष अ‍ॅड आकाश छाजेड, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शरद कोशिरे, भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने, यांसह सर्व पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिकांसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  बाळासाहेबांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात रविवारी सकाळी अकरा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.