दोघींचे वय अवघे सहा वर्षे.. एकीला नाव तरी सांगता येत होते, दुसरी थोडी मतिमंद होती.. खेळत-खेळत आईपासून दूर गेल्या.. आई-बाबा सापडत नसल्यामुळे रडणे सुरू केले.. नागरिकांनी त्या मुलींच्या पालकांचा शोध घेतला, मात्र न सापडल्याने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.. त्यांनी त्या मुलींना ‘सोफोश’ या बालकांच्या समाजसेवी संस्थेत ठेवले. पोलिसांच्या प्रयत्नामुळे व आई-वडिलांच्या धडपडीमुळे या मुलींना त्यांचे आईबाबा मिळाले..
साक्षी व रोशनी अशी त्या दोघींची नावे. सहा वर्षे वयाच्या साक्षीचे आई-वडील हे मूळचे परभणी येथील राहणारे आहेत. तिचे वडील म्हाळुंगे येथे काम करतात. त्यांना भेटण्यासाठी साक्षी ही आईसोबत रेल्वेने पुण्यात आली होती. पुणे रेल्वे स्टेशन येथे खाऊ आणण्यासाठी गेलेली साक्षी परत आलीच नाही. त्यामुळे तिच्या आई व वडिलांनी रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रारही दिली होती. तिचा शोध सुरू होता. ती हरवल्यापासून तर तिची आई सारखा अक्रोश करत होती. ६ डिसेंबर रोजी शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलशेजारी एक लहान मुलगी नागरिकांना दिसली. तिचे आई-वडील न सापडल्यामुळे त्यांनी तिला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घेतला. मात्र, ते न मिळाल्यामुळे तिला ‘सोफोश’ या बालकांच्या समाजसेवी संस्थेत दाखल केले. या ठिकाणी ती मुलगी आपले नाव, आईचे, वडिलांचे नाव सांगत होती, मात्र, तिला अडनाव सांगता येत नव्हते. तिचे आई-वडील गेले सात दिवस तिचा शोध घेत होते. शेवटी शुक्रवारी सोफोश येथे साक्षी असल्याचे समजले. त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर साक्षीने आपल्या आई-वडिलांना ओळखल्यानंतर त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
दुसऱ्या मुलीचे नाव रोशनी. काळेवाडीजवळील रहाटणी येथे ती आई-वडिलांसोबत राहते. ११ डिसेंबर रोजी चिंचवड पोलिसांच्या हद्दीत एक सहा वर्षांची मुलगी रडत असताना नागरिकांना आढळून आली. त्यांनी तिला तत्काळ चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घेतला. मात्र, ते न मिळाल्यामुळे तिलाही सोफोश या संस्थेत दाखल करण्यात आले. रोशनी ही थोडीशी मतिमंद असल्यामुळे तिला स्वत: चे नाव देखील सांगता येत नव्हते. दरम्यान मुलींच्या पालकांनी सांगवी पोलीस ठाण्यात रोशनी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार ती हरवल्याची बातमी एका दैनिकामध्ये प्रसिद्ध झाली. त्यावरून चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अशा वर्णनाची मुलगी सापडल्याचे सांगवी पोलीस ठाण्यास कळविले व त्या मुलीस सोफोश संस्थेत दाखल केल्याचे सांगितले. रोशनीचे वडील व सांगवी पोलीस ठाण्याचे कर्मचारी एन. आर पवार, जे. बी. शिंदे आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक बी. डी. जाधव यांनी ही मुलगी मिळवून देण्यास मदत केली. सोफोश येथील सामाजिक कार्यकर्त्यां दीपाली कलापुरे यांनी रोशनीने तिच्या वडिलांना ओळखल्यानंतर त्यांच्या ताब्यात दिले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Dec 2012 रोजी प्रकाशित
अन् ‘त्या’ दोघींना पुन्हा आई-बाबा सापडले!
दोघींचे वय अवघे सहा वर्षे.. एकीला नाव तरी सांगता येत होते, दुसरी थोडी मतिमंद होती.. खेळत-खेळत आईपासून दूर गेल्या.. आई-बाबा सापडत नसल्यामुळे रडणे सुरू केले.. नागरिकांनी त्या मुलींच्या पालकांचा शोध घेतला, मात्र न सापडल्याने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले..
First published on: 15-12-2012 at 03:01 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Both the baby found parents