समाजकल्याण समितीचे सभापती प्रा. शाहूराव घुटे व जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदिप भोगले जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने काम करत आहेत, समितीसाठी तरतूद केलेल्या २ कोटी रुपयांपैकी १ कोटी ३० लाख रु. ची खरेदी केलेल्या वस्तू सदस्यांना नमुने न दाखवताच व बाजारभावापेक्षा अधिक किमतीने खरेदी केल्या, असा आरोप करत समितीच्या सदस्यांनी आज सभेवर बहिष्कार टाकला. सभापती घुटे व भोगले यांनी सभा शांततेत झाली, कोणीही बहिष्कार टाकला नाही, सदस्यांशी चर्चा करुनच खरेदी झाली, असे सांगत आरोप फेटाळून लावला.
समाजकल्याण समितीची सभा आज झाली. त्यानंतर समितीचे सदस्य तुकाराम शेंडे, रावसाहेब भुतांबरे, गोरक्ष मोरे, रावसाहेब साबळे, मंदा गायकवाड, मिरा चकोर, अनिता पवार, जयश्री डोळस या ८ सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकल्याची माहिती दिली. सभा सुरू होण्यापूर्वीच सभापतींनी सदस्यांच्या उपस्थितीच्या सह्य़ा रजिस्टरवर घेतल्याचा दावा त्यांनी केला. पुढील सभेत खरेदी केलेल्या वस्तूंच्या दर्जाची तपासणी करुनच त्यास मान्यता दिली जाईल, असे या सदस्यांनी सांगितले.
सदस्यांना अंधारात ठेवून खरेदी केली जाते, याचा अर्थ कोठेतरी पाणी मुरते आहे, अशा शब्दात या सदस्यांनी आरोप केला. या सदस्यांनी सांगितले की, घुटे व भोगले सदस्यांना योजनांची माहिती देत नाहीत, खरेदी ई-टेंडरींग पद्धतीने झाल्याचे सांगतात, प्रत्यक्षात खरेदी मात्र बाजारभावापेक्षा २५ टक्के अधिक रकमेने करण्यात आली आहे.
दोघांच्या कार्यपद्धतीबद्दल यापूर्वीच अध्यक्षांचे लक्ष आम्ही वेधले होते. परंतु कार्यपद्धतीत फरक पडलेला नाही.
सभापती घुटे व भोगले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, सदस्यांची तक्रार गैरसमजातून आहे, सभा शांततेत झाली, कोणीही बहिष्कार टाकला नाही, कोणत्या योजनांसाठी कोणत्या वस्तूंची खरेदी करायच्या याची माहिती सदस्यांना दिली गेली होती, खरेदी ई-टेंडरींग पद्धतीच्या पारदर्शी पद्धतीने झाली, त्याची कार्यपद्धत सरकारने ठरवून दिली आहे. वस्तूंच्या खरेदीचे नमुने समितीत सदस्यांसमोर सादर झाले नसले तरी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. आजच्या सभेत खरेदीचा विषयच नव्हता, गेल्या सभेतच त्यास मान्यता दिली गेली आहे.     

सदस्यांच्या लंघेंकडेही तक्रारी
सायंकाळी समितीच्या सभेवर बहिष्कार टाकलेल्या सदस्यांनी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांची भेट घेऊन सभापती घुटे व भोगले यांच्याविषयी तक्रारी केल्या. लंघे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, समितीच्या ८ सदस्यांची तक्रार गैरसमजातून होती, तिचे निराकरण करण्यात आले. सभापती विश्वासात घेत नाही या व अन्य काही कारणांतून त्यांची नाराजी होती, ती आता दूर झाली आहे. काही अडचणी असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधण्यास सदस्यांना सांगितले आहे. या चर्चेनंतर दोन सदस्यांशी संपर्क साधला असता, पत्रकारांनी विचारल्यास तक्रार गैरसमजातून केली, आता वाद नाही, असे स्पष्टीकरण अध्यक्ष लंघे यांनी देण्यास सांगितल्याचे त्यांनी उघड केले.