संकटप्रसंगी मदत करतो तोच खरा मित्र असे म्हणतात. गोसराणे येथील योगेश जगताप या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू होते. त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानाने अपघातात जखमी झालेल्या मित्राला जीवदान मिळाले.
कळवण येथील डांग सेवा मंडळ संचालित जनता विद्यालयातील इयत्ता सहावीचा विद्यार्थी करण गायकवाड नेहमीप्रमाणे गोसराणे येथून पायी शाळेत येत असताना एका मोटार सायकलने जोरात धडक दिली. त्यामुळे करणला जखम होऊन रक्त वाहू लागले. त्याच्याबरोबर असलेला इयत्ता सहावीतील विद्यार्थी योगेश जगताप ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अडवून जखमी करणला दवाखान्यात पोहोचविण्यासाठी अक्षरश: विनवणी करीत होता, पण कोणीही थांबण्यास तयार नव्हते. अधिक उशीर झाल्यास करणच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन योगेशने जखमी करणला खांद्यावर उचलून घेत आरोग्य केंद्राकडे धावतच सुटला. हे दृश्य पाहून एका मोटारसायकलस्वाराने दोघांना तात्काळ अभोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
योगेशने शाळेत येऊन सर्व प्रकार कथन केल्यावर संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब मराठे, मुख्याध्यापक ए. एम. बागूल यांच्यासह इतर शिक्षकांनी आरोग्य केंद्रात धाव घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकृती गंभीर असल्याने करणला तात्काळ नाशिक येथे हलविण्यास सांगितले.
करणच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई-वडील सालदारकी व मजुरीसाठी दुगाव येथे राहतात. करण आजीकडेच राहतो. काही जणांनी खासगी वाहनाने करण यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, सचिव डॉ. विजय बिडकर, संचालक मृणाल जोशी रुग्णालयात उपस्थित झाले.  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करणची तब्येत अत्यंत नाजूक असून त्यास तात्काळ मुंबई येथे न्यावे लागेल असे सूचित केले. करणला मुंबईला नेण्याइतपत वेळही नव्हता आणि त्याच्या घरची आर्थिक परिस्थितीही नव्हती. त्यामुळे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयात करणला दाखल करण्याचा निर्णय घेतला. डॉ. वसंत पवार यांच्या रुग्णालयात त्यास हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी अल्पदरात शस्त्रक्रिया केल्याने करणचे प्राण वाचू शकले. अशा प्रकारे विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक आणि डॉक्टर या सर्वाच्या एकत्रित प्रयत्नांनी एका विद्यार्थ्यांला जीवदान मिळू शकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boy helped out his injured friend
First published on: 01-10-2013 at 09:18 IST