दोन वर्षांच्या एका चिमुरडय़ाचा गळा दाबून खून झाल्याची घटना शहरातील न्यू बुधवार पेठेत रामजी चौकात घडली. हा खून कोणी व कशासाठी केला, याचे गूढ कायम असून त्याचा उलगडा जोडभावी पेठ पोलीस करीत आहेत.
अनादी संतोष सोनवणे असे दुर्दैवी मृत मुलाचे नाव आहे. या संदर्भात त्याची आई माधुरी सोनवणे हिने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार या घटनेची माहिती अशी की, माधुरी सोनवणे हिने आपल्या घरात दुपारी मुलगा अनादी यास दूध पाजवून पलंगावर झोपविले होते. त्यावेळी घरात अन्य कोणीही नव्हते. नंतर दुपारी चारच्या सुमारास माधुरी घरात आल्यानंतर दूध पाजण्यासाठी मुलगा अनादी यास उचलून घेतले असता  तो कसलीही हालचाल करीत नसल्याचे दिसून आले. त्याच्या गळ्यावर समोरील बाजूस बोटाने दाबल्याचे व्रण दिसत होते.
न्यायालयाची फसवणूक
न्यायालयातील एका खटल्याप्रकरणी यल्लप्पा येलदी आपणच आहोत असे भासवून मालमत्तापत्रक उतारा काढून यल्लप्पा येलदी यांच्या नावे प्रतिज्ञापत्र दाखल करून त्याचा गैरवापर केला व यल्लप्पा यांच्यासह न्यायालयाचीही फसवणूक केल्याप्रकरणी सतय्या येलदी  याच्याविरुध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.