स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याच्या दृष्टीने ‘बालिका जन्मोत्सव’ योजनेनंतर महापालिकेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले असून या विषयावर प्रबोधन करण्यासाठी १९ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील विविध भागांत नाटय़प्रयोगाचे आयोजन करण्यात येणार आहे.
समाजातील स्त्रीच्या अस्तित्वालाच धोका पोहोचू पाहणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्येचा विषय सध्या सर्वत्र गंभीर बनला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने या विषयावर विविध उपक्रम, मोहीम आखण्यात येत असताना महापालिकेने नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने बालिका जन्मोत्सव योजना सुरू केली. या योजनेनंतर आता पुढील आठवडय़ात पालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांतर्गत मुंबईच्या वझिरा गणेश निर्मिती संस्थेच्या वतीने स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याविषयी प्रबोधनपर नाटय़प्रयोग सादर केले जाणार आहेत. शहर व परिसरातील एकूण १२ ठिकाणी हे प्रयोग सादर होणार आहेत. त्यात १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पश्चिम विभागातील पंचशीलनगर उद्यानाजवळ आणि रात्री आठ वाजता गंगावाडी पटांगण, २० रोजी पंचवटीतील फुलेनगर शाळा आणि रात्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजासमोर, २१ रोजी नाशिक पूर्वमधील सावतामाळी उद्यानाजवळ व रात्री वडाळा गाव हिरे हायस्कूल पटांगण, २२ रोजी नाशिकरोड विभागातील देवळाली गावातील शिवाजी समाजमंदिर व रात्री जेलरोड येथील दुर्गा माता मंदिर, २३ रोजी सातपूर विभागातील शाळा क्रमांक ९३ व रात्री चुंचाळे शिवारातील संजीवनगर येथील मारुती मंदिर, २४ रोजी सिडकोतील लोकनेते नानासाहेब उत्तमराव पाटील क्रीडासंकुल मैदान व रात्री शिवाजी चौकातील शनि मंदिर, अशा प्रकारे एकूण १२ ठिकाणी महापालिकेच्या वतीने जनजागृतीपर नाटय़प्रयोग सादर केले जाणार आहेत. या नाटय़प्रयोगास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय विभागाचे अधीक्षक डॉ. डी. बी. पाटील यांनी केले आहे.