रास्ता रोकोमुळे स्थानिकांना त्रास
वीज दरवाढीच्या विरोधात गुरूवारी दुपारी विविध औद्योगिक संघटनांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर घंटानाद करताना अचानक रास्तारोको आरंभिल्याने स्थानिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच रांगा लागल्या. यावेळी चर्चा करण्यास वीज कंपनीचे मुख्य अभियंता उपस्थित न राहिल्यावरून उद्योजकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांचा निषेध केला.
महावितरण कंपनीने केलेल्या दरवाढीच्या विरोधात संपूर्ण राज्यातील औद्योगिक संघटनांनी गुरूवारी एकाचवेळी सर्वत्र महावितरणच्या मुख्य कार्यालयांसमोर घंटानाद आंदोलनाचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने नाशिक व अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा, आयमा), नाईस, लघु उद्योग भारती, भाजप महाउद्योग आघाडी, प्लास्टीक असोसिएशन, भगर मील असोसिएशन, वुडन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन आदी संघटनांच्यावतीने नाशिकरोड येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी दुपारी सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झाले. परंतु, त्यांची संख्याही अतिशय तुरळक होती. घंटानाद करत त्यांनी दरवाढीला विरोध दर्शविला. दरवाढीच्या मुद्यावर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार होती. तथापि, यावेळी मुख्य अभियंता कार्यालयात नसल्याचे समजल्यावर आंदोलक संतप्त झाले. आंदोलनाची पूर्वसूचना देऊनही ते निघून गेल्याची तक्रार करण्यात आली. दरम्यानच्या काळात उद्योजकांनी रास्तारोको सुरू केल्यामुळे गोंधळास सुरूवात झाली.
आंदोलकांनी अचानक हे आंदोलन केल्यामुळे परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला. यावेळी बिटको रुग्णालयात निघालेल्या एका रुग्णाची रिक्षाही रोखून धरण्यात आली. या कारणास्तव स्थानिक राजकीय कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये शाब्दीक चकमक झडल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले.
दुसरीकडे जो पर्यंत मुख्य अभियंता ‘निमा’च्या कार्यालयात स्वत: येऊन उद्योजक व सर्व संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार नाहीत, तो पर्यंत वीज कंपनीशी असहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मागणी पूर्ण होईपर्यंत वीज कंपनीशी कुठलीही चर्चा केली जाणार नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. मुख्य अभियंतांना आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासही वेळ नव्हता. आधी कल्पना असूनही ते आंदोलनावेळी कार्यालयात उपस्थित राहिले नाही, अशी तक्रार उद्योजकांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात कार्यालयाशी संपर्क साधला असता मुख्य अभियंता प्रभाकर शिंदे हे शासकीय कामकाजासाठी दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. हा दौराही पूर्वनिश्चित असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महावितरण कंपनीने वीज बिलात ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत अन्यायकारक वाढ केली आहे. आर्थिक मंदीमुळे उद्योग अडचणीत असताना वीज कंपनीने केलेली दरवाढ चिंतेची बाब असून त्यामुळे उद्योजक स्पर्धेत पिछाडीवर पडतील, अशी भिती महाराष्ट्र औद्योगिक समन्वय समितीने निवेदनात व्यक्त केली आहे.