थेट पाइपलाइन पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार झाले पाहिजे. हा प्रकल्प राबवताना पारदर्शकता दाखवली पाहिजे. शहरातील तज्ज्ञांची मते आणि सल्ले संबंधितांनी जाणून घेतले पाहिजेत, यासाठीच ‘कोल्हापूर कॉलिंग फोरम’ची स्थापना येत्या प्रजासत्ताकदिनी केली जाणार आहे. नियोजित फोरमची प्राथमिक बठक श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवन येथे झाली. झालेल्या या बठकीला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. फोरमचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना थेट पाइपलाइनसंदर्भात भेटणार आहे.
‘हाक कोल्हापूरची…’ ही संकल्पना घेऊन बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल, बी. जी. मांगले, पीटर चौधरी यांनी ‘कोल्हापूर कॉलिंग फोरम’ या संघटनेची घोषणा केली. बठकीत प्रामुख्याने काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइन टाकून कोल्हापूरला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणा-या महत्त्वाकांक्षी योजनेवर चर्चा झाली. यापूर्वीची शिंगणापूर पाणीपुरवठा योजना गळकी योजना म्हणून प्रसिद्ध आहे. या योजनेचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्ते विकास प्रकल्पाच्या दर्जाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे थेट पाइपलाइन योजनेचे काम अतिशय निर्दोष झाले पाहिजे. ही योजना राबविणा-यांनी कमालीची पारदर्शकता दाखवली पाहिजे, या उद्देशावर फोरमच्या बठकीत चर्चा झाली.
श्रीमंत शाहू छत्रपती यांनी कोल्हापूरच्या विकासकामांसाठी या फोरमचा चांगला उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जीवन प्राधिकरणचे निवृत्त अधीक्षक अभियंता अशोक कुलकर्णी यांनी या योजनेवर अभ्यास करून काही निश्चित मार्गदर्शन फोरमकडून व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महापालिकेचे निवृत्त शहर अभियंता डी. एस. भोसले यांनी थेट पाइपलाइन योजनेच्या एकूण खर्चाचे अंदाजपत्रक व आराखडे मागवून घेऊन त्यावर तज्ज्ञांनी अभ्यास केला पाहिजे. योजनेसंदर्भात लोकांच्या काही शंका-कुशंका, तक्रारी व सूचना असतील तर त्यांची दखल घेतली पाहिजे, असे सांगितले. जीवन प्राधिकरणचे निवृत्त अभियंता दिलीप ठकार यांनी थेट पाइपलाइनसाठी सर्वानीच दक्षता घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. बी. जी. मांगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पारस ओसवाल, योगेश्वर कुलकर्णी, अनिल घाटगे, विनायक रेवणकर, सुभाष नियोगी, नगरसेवक सत्यजित कदम, तसेच नाथाजी पवार, सुभाष पोफळे आदींची भाषणे झाली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2014 रोजी प्रकाशित
थेट जलवाहिनी योजनेसाठी ‘कोल्हापूर कॉलिंग फोरम’
थेट पाइपलाइन पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार झाले पाहिजे. हा प्रकल्प राबवताना पारदर्शकता दाखवली पाहिजे. शहरातील तज्ज्ञांची मते आणि सल्ले संबंधितांनी जाणून घेतले पाहिजेत, यासाठीच ‘कोल्हापूर कॉलिंग फोरम’ची स्थापना येत्या प्रजासत्ताकदिनी केली जाणार आहे.
First published on: 21-01-2014 at 03:15 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Calling forum kolhapur for direct water plan