येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूट आणि रिसर्च सेंटरच्या वतीने दोन डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता के.टी.एच.एम. महाविद्यालयात ‘आरोग्यम् धनसंपदा’ शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त तीन हजार टी शर्टस्चे मोफत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सेंटरचे संचालक डॉ. अनिरूध्द धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिबीराचे उद्घाटन योगासनांनी होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व आहार तज्ज्ञ डॉ. अंजली मुखर्जी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर तीन किलोमीटर चालण्याची फेरी काढण्यात येणार आहे. यानंतर व्यायामाचे प्रात्यक्षिक होईल. डॉ. मुखर्जी यांचेही मार्गदर्शन होईल. दुपार सत्रात डॉ. धर्माधिकारी ‘लाइफ स्टाईल मॅनेजमेंट’ विषयी मार्गदर्शन करतील.
१० हजार लोकांची मोफत रक्त शर्करा तपासणी करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल.
स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या पटांगणावर भरविण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, एच.ए.एल. स्कूल अ‍ॅल्युमनी, वैद्यकीय महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले आहे. या शिबीरास उपस्थित राहण्यासाठी सकाळी सहा वाजता शहरातील वेगवेगळ्या भागातून मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ०२५३-२५००७००१, ९१५८८८७५५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.