महाराष्ट्र राज्य हिंदू खाटीक समाजजागृती व विकास मेळावा वाई येथे झाला. या मेळाव्यात समाजातील उच्चशिक्षित बांधवांनी समाजजागृती व विकासाचे काम हाती घ्यावे असे आवाहन ज्येष्ठ लोकांनी केले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. समाजातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक व उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले. समाजातील युवकांमध्ये हुंडाबंदी, अंध:श्रद्धा व्यसनाधीनता, महिला सबलीकरण, आदींबाबत चर्चा झाली. वृद्ध व महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. शासकीय योजना व सवलतीची माहिती सर्वाना व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजाच्या वेबसाईटचे प्रकाशन या वेळी झाले. महेंद्र घोलप यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातून मोठय़ा संख्येने समाजबांधव उपस्थित होते. उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त डॉ. सागर घोलप यांनी आभार मानले.