संत गाडगेबाबामहाराज स्मृतिदिनाचे औचित्य साधून लातूर शहरातील विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून २० ते २२ डिसेंबर दरम्यान लातुरात कचरा व प्लास्टिक कॅरिबॅग मुक्तीसाठी जनजागृती अभियान सुरू होत आहे, अशी माहिती शिरीष पोफळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्या (गुरुवारी) सकाळी ९ वाजता महात्मा गांधी पुतळ्यापासून अभियानास प्रारंभ होईल. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ कडतणे यांच्या हस्ते, महापौर स्मिता खानापुरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता हे अभियान राबवण्यात येणार आहे. अभियानात लातुरातील नारी प्रबोधन मंच, आदर्श महिला गृहउद्योग, जानाई प्रतिष्ठान, मातृभूमी सेवाभावी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, मुस्लिम क्रांतिसेना, सुमन संस्कार केंद्र, राजस्थान शिक्षणसंस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, रोटरी सेंटर आदी सेवाभावी संस्था सहभागी होणार आहेत. शुक्रवारी (दि. २१) सकाळी ९ वाजता अभियानाची सुरुवात हनुमान चौक, मेन रोडमार्गे गंजगोलाई परिसर तसेच शनिवारी सकाळी ९ वाजता शिवाजी चौक ते जुन्या रेल्वे मार्गाने दयानंद महाविद्यालय, रयतु बाजार, ज्ञानप्रकाश प्रतिष्ठान येथे समारोप होणार आहे. २० ते २२ डिसेंबर दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत विविध ठिकाणी स्वच्छता, जनजागृती मोहीम, प्लास्टिक कॅरिबॅग वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्यांचे वितरण आदी उपक्रमांचे आयोजन केले आहे. नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व नगरसेवकांनी स्वच्छ लातूर, सुंदर लातूर ही संकल्पना साध्य करण्यासाठी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Campagine on carry bag free latur from today
First published on: 20-12-2012 at 02:03 IST