लोकसभा निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी उमेदवार यंदा प्रचाराच्या नाना तऱ्हांचा अवलंब करताना दिसत आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघरमध्ये रॅली, गृहभेटी यांच्यासारख्या पारंपरिक प्रचाराचा अवलंब करत असतानाच, आपला प्रचार वेगळा होण्यासाठी जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्ष नवनव्या क्लृप्त्या योजत आहेत.
* उपनगरीय रेल्वेतला प्रचार..
ठाणे स्थानक संध्याकाळच्या गर्दीने गजबजलेले असताना अचानक उमेदवार कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह तिथे प्रवेश करतात. सॅटीसवरील बस स्थानकातून घरी निघालेल्या प्रवाशांशी हस्तांदोलन करतात. कार्यकर्ते पुढे येऊन प्रचारपत्रकांचे वाटप करतात ‘आपल्या उमेदवाराला निवडून द्या’, असे आवाहन करतात. इथला प्रचार संपल्यावर उमेदवार हात दाखवत फलाटाच्या दिशेने निघतो..येणाऱ्या लोकलमध्ये चढण्यासाठी कार्यकर्ते रस्ता करून देतात. पक्षाचा जयजयकार करत आणि उमेदवारांच्या नावे घोषणा देत उमेदवार लोकलमध्ये चढतो. कार्यकर्त्यांनी पडकलेल्या सीटवर बसून उमेदवार प्रवाशांशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करतो. सोबतचा छायचित्रकार फोटो काढतो. आणि आपला प्रचार झाला असे लक्षात आल्यानंतर कळवा स्थानकात हा उमेदवार उतरून लोकलचा प्रचार संपवतो. ठाण्यात मनसे, कल्याण-डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी कँाग्रेसच्या उमेदवारांनी प्रचाराचा हा मार्ग अवलंबून पाहिला आहे. इतर पक्षांनीही लोकल प्रवासातील प्रचाराला महत्त्व देण्यास सुरुवात केली.   
*  प्रचारासाठी वासुदेव आला…
झुंजुमुंजु पहाट होत असताना सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी गाणी गात येणारा वासुदेव ठाण्यामध्ये मनसेचा प्रचार करताना दिसत असून शहरातील प्रमुख भागांमध्ये पोहचण्यासाठी सुमारे ३२ वासुदेवांची फळीच या पक्षाने आपल्या प्रचारात उतरवली आहे. वासुदेव शहरी भागात दुर्मीळ होत असल्याने पारंपरिक वेशातील वासुदेव सोसायटय़ांच्या परिसरात आल्यानंतर मुलांची मोठी गर्दी उसळते. याच वेळी हा वासुदेव पक्षाने केलेली कामे सांगून उमेदवाराला निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन करतो. सोबतचे कार्यकर्ते पत्रकबाजी करतात.
* एलईडी स्क्रिन, प्रचार रथ..
वाहनांवर एलईडी स्क्रीन लावून त्यावर आपल्या पक्षाच्या उमेदवारांची कामे, पक्षप्रमुखांचे आवाहन, पक्षाचे प्रचारगीत, माजी खासदारांचे लोकसभेतील भाषणे दाखवण्याची व्यवस्था सर्वच पक्षांनी यंदा मोठय़ा प्रमाणात वापरली आहे. प्रचाराचा हा अत्याधुनिक आणि वेगळा मार्ग असून दृकश्राव्य माध्यमाचा प्रभाव अधिक पडत असल्याने त्याचा वापर करून घेण्यात आला आहे. ठाणे आणि कल्याणमधील प्रमुख चौकांमध्ये अशा प्रकारचे एलईडी लावलेल्या गाडय़ा दाखल झाल्यानंतर लोकांची प्रचंड गर्दी उसळत आहे. तर प्रचाररथावर स्वार होऊन उमेदवार रॅलीतून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतो आहे. रॅलीतील उमेदवाराच्या वाहनाला इंजिनचा आकार देऊन आपल्या प्रचार चिन्हाचा खुबीने वापर करून घेतला आहे.
* उमेदवारांची महती सांगणारी पथनाटय़ही..
महाविद्यालयीन तरुण अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार अशा समाजातील अपप्रवृत्तीवर भाष्य करण्यासाठी पथनाटय़ांचे सादरीकरण करत असून या पथनाटय़ांचा आधार विविध पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतला आहे. पक्षांच्या तरुण कार्यकर्त्यांचा हा चमू शहरातील चौका चौकात पथनाटय़ सादर करत परिवर्तनाची हाक देताना दिसत आहे.
*  फोन, एसएमएस पद्धत मागे पडली..
गेल्या काही निवडणुकांमध्ये दूरध्वनीवरून पक्षाच्या उमेदवाराचे ध्वनिमुद्रित केलेले भाषण ऐकवणारे, आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करणारे फोन कॉल्स केले जात होते. अनेक ठिकाणी एसएमएसचा पर्याय वापरला जात होता. व्हॉट्स अ‍ॅपमुळे संपर्काच्या यापद्धती कालबाह्य़ झाल्या आहेत.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidate using different way of campaigning in lok sabha election
First published on: 19-04-2014 at 02:41 IST