दोन वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्य़ातील हजारो गुंतवणूकदारांना कोटय़वधीचा गंडा घालणारा ‘कॅपझोन ट्रेडर्स प्रा. लि.’ या कंपनीचा प्रमुख रवींद्र वसंत चौधरी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. ‘कॅपझोन’च्या परभणीतील विविध बँकांची खाती पोलिसांनी ‘सील’ केल्यामुळे पुढील तारखांचे गुंतवणूकदारांना दिलेले धनादेश वटण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘कॅपझोन’वर पोलिसांनी २८ जानेवारीच्या रात्री छापा टाकला. या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ शकते, ही शक्यता गृहीत धरून पोलिसांनी विसावा कॉर्नरजवळील ‘कॅपझोन’ कार्यालयातील काही कागदपत्रे व साडेनऊ लाख रुपयांची रोख रक्कम छापा टाकून जप्त केली. त्या वेळी कार्यालयात हजर असलेल्या काही एजंटांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या एजंटांकडून यवतमाळचा रहिवासी असलेला रवींद्र चौधरी ‘कॅपझोन’चा प्रमुख असून तो सर्व व्यवहार मुंबईतून पाहत असल्याची माहिती मिळाली.
छाप्याच्या वेळी एजंटांमार्फत पोलिसांनी चौधरीशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. आपण दुसऱ्या दिवशी सकाळी ‘कॅपझोन’ संबंधात कागदपत्रे सादर करण्यास परभणीत पोहोचत आहोत, असे तो म्हणाला. परंतु चौधरी परभणीकडे फिरकलाच नाही. त्यामुळे पोलिसांनी ३१ जानेवारीच्या रात्री गुन्हा दाखल करून तीन एजंटांना अटक केली. ‘कॅपझोन’वर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पथक मुंबईला रवाना झाले. परंतु चौधरी दिलेल्या पत्त्यावर आढळला नाही. गुन्हा दाखल होऊन आठ दिवस झाले. अजून तो पोलिसांच्या हाती लागला नाही.
दरम्यान, पोलिसांनी ‘कॅपझोन’ची विविध बँक खाती सील केली. ‘कॅपझोन’कडून पुढील तारखेचे धनादेश गुंतवणूकदारांना देण्यात आले आहेत. बँक खाती सील झाल्याने आता हे धनादेश वटणार नाहीत. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक होणार आहे. पोलिसांच्या छाप्यामुळे कमीत कमी यापुढे होणारी जनतेची फसवणूक थांबली आहे.
जिल्ह्य़ात ‘कॅपझोन’सारखेच दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवणाऱ्या इतर कंपन्या आहेत. अशा बनावट कंपन्यांविरुद्ध जनतेने पोलिसांत येऊन तक्रारी नोंदवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.