मतदारांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेल्या ओळखपत्रांच्या यादीतून केंद्रीय निवडणूक आयोगाने शिधापत्रिका वगळली आहे. मतदार छायाचित्र ओळखपत्र उपलब्ध नसले तरी आता मतदानासाठी ११ प्रकारची छायाचित्रांकित ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यापैकी कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र सादर करून मतदान करता येईल. त्याचबरोबर मतदानाला जाण्याआधी मतदारांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव यादीत असल्याची खातरजमा करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. मुंबई, ठाण्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी गुरुवार, २४ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आयत्यावेळी मतदार यादीतील नावाचा घोळ टाळण्यासाठी मतदारांनी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीत आपले नाव असल्याची खातरजमा करून घ्यावी.
मतदार ओळखपत्राशिवाय ११ अधिकृत ओळखपत्रे
पासपोर्ट
वाहन परवाना
केंद्र शासन/राज्यशासन/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र
छायाचित्र असलेले बँक/टपाल खात्याचे पासबुक
पॅनकार्ड
आधार कार्ड
नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर’अंतर्गत स्मार्ट कार्ड
मनरेगा जॉब कार्ड
कामगार मंत्रालयाकडून देण्यात आलेले स्वास्थ्य विमा स्मार्ट कार्ड
छायाचित्र असलेले सेवानिवृत्तीचे कागदपत्र
निवडणूक विभागाने दिलेली प्रमाणित छायाचित्र मतदारचिठ्ठी