शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक असल्याचे वृत्त वाहिन्यांवरून बुधवारी रात्रीपासून प्रसारीत होऊ लागले आणि सर्व शिवसैनिकांच्या नजरा ‘मातोश्री’कडे लागल्या. प्रदीर्घ काळ बाळासाहेब अन् सेनेशी ऋणानुबंध जोपासणाऱ्या ज्येष्ठ, युवा शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या छटा उमटल्या. मनसेच्या स्थापनेनंतर शिवसेनेला सोडचिठ्ठी देणाऱ्या अनेक प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची यापेक्षा वेगळी भावना नव्हती. अनेक पदाधिकाऱ्यांनी तडक मुंबईकडे कूच केले तर नाशिकमध्ये शिवसेनेच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी दिवसभर दुरचित्रवाणीसमोर बसून जपमाळ  सुरू केली. नाशिकसह धुळे येथे मंदिरांमध्ये महाआरती करत शेकडो शिवसैनिकांनी बाळासाहेबांना दिर्घायू लाभावे म्हणून प्रार्थना केली. सर्वत्र हुरहूर, अस्वस्थता आणि चिंता असेच वातावरण दिसून आले.
बाळासाहेबांचे नाशिकवर विशेष प्रेम. नाशिकमधील अनंत कान्हेरे मैदान असो, जिल्हा परिषदेचे मैदान असो वा पंचवटीतील श्रीराम विद्यालयाचे मैदान. बाळासाहेबांची सभा म्हटली की, लाखोंची गर्दी ठरलेली. कोणत्याही प्रश्नावर त्यांची रोख-ठोक भूमिका आणि विलक्षण वकृत्व शैलीने प्रभावित झालेल्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची झपाटय़ाने वाढ झाली.     संघटनेच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहून अस्वस्थता निर्माण झाली. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात चित्रफितीव्दारे खुद्द बाळासाहेबांनी आपली तब्येत आता साथ देत नसल्याचे सांगितल्यावर सर्वच हळहळले. मेळाव्यातून परतल्यावर स्थानिक शिवसैनिकांनी बाळासाहेबांची प्रकृती सुधारावी म्हणून आपल्या परीने उपक्रम हाती घेतले.
बुधवारी मध्यरात्रीपासून बाळासाहेबांची तब्येत अधिक गंभीर झाल्याचे वृत्त पसरल्यावर स्थानिक पातळीवरही चिंतेचे सावट अधिकच गडद झाले. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणारा नाशिकरोड, भगूर, देवळाली कॅम्प परिसरात तर प्रत्येक शिवसैनिकाच्या घरी बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना सुरू झाली. याच परिसराने जिल्ह्याला शिवसेनेचा पहिला आमदार दिलेला असल्याने बाळासाहेबांविषयी शिवसैनिक विशेष हळवे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर आ. बबन घोलप, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नाशिकरोडचे ग्रामदैवत असलेल्या दुर्गा देवीच्या मंदिरात सामुहिक प्रार्थना केली. माजी महानगरप्रमुख तथा माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांनी त्र्यंबकेश्वर व कपालेश्वर मंदिरात अभिषेक केला. बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभावे, असे साकडे घालण्यात आले. नाशिकरोड येथील कार्यक्रमास प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. त्यांच्या चेहेऱ्यावर अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती. त्यातील अनेकांनी कधी बाळासाहेब यांच्या सभेला हजेरी लावलेली तर कधी दसऱ्या मेळाव्याला. त्यांच्या विचाराने प्रेरीत होऊन संघटनेच्या कामात सक्रिय झालेल्या अनेक शिवसैनिकांना अश्रू रोखणे अवघड झाले.
सध्याच्या तरुण पिढीतील शिवसैनिकांप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची स्थापना करण्यापासून संघटनेचे जाळे विणण्यासाठी ज्यांनी कठोर परिश्रम केले, त्या ज्येष्ठ शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनाही आपली भावना रोखणे अवघड झाले. त्यातील उत्तमराव तथा मामा तांबे, अण्णा लकडे हे ज्येष्ठ शिवसैनिक घरातच दुरचित्रवाणीवरील बातम्या पाहून अस्वस्थ झाले होते. शिवसेनेच्या स्थापनेवेळी त्यांचा बाळासाहेबांशी संबंध आला होता. त्यावेळी जुळलेले ऋणानुबंध, त्या आठवणी, त्यांच्याकडून मिळालेली शाबासकीची थाप, त्यांची त्यावेळची गाजलेली भाषणे, ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रांच्या आठवणी, अशा सर्व भावना दाटून आल्या होत्या.
गुरूवारी दिवसभर शालिमार चौकातील शिवसेना कार्यालय
शांत होते. नाशिकरोडसह वेगवेगळ्या भागात शिवसैनिकांकडून मंदिरात पूजा, अभिषेक केले जात असल्याने कार्यालयात फारसे कोणी फिरकले नाही. सर्वाच्या नजरा दुरचित्रवाणीवरील बातम्यांकडे लागल्या होत्या.