औषध विक्रेत्यांवर येणाऱ्या विविध कायदेशीर गंडांतरांची जाणीव साक्री तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या साक्री येथील बैठकीत महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे संघटक सचिव विनयभाई श्रॉफ यांनी करून दिली.
साक्रीच्या सिंधी भवनात संघटनेचे सेंट्रल झोनचे अध्यक्ष राजेंद्र गिंदोडीया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. संघटनेचे बाबूशेठ भगत, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सुनील चौधरी, साक्री तालुका अध्यक्ष योगेश बिरारीस, गिरीश अहिरराव, राजेंद्र जैन, बंटी चौधरी, प्रवीण कांकरिया उपस्थित होते. सूत्रसंचालन धनंजय सोनवणे यांनी केले. प्रास्तविक बिरारीस यांनी केले.  निजामपूर, पिंपळनेर, साक्री व अनेक गावांचे केमिस्ट आवर्जून उपस्थित होते.
धुळे जिल्हा केमिस्ट संघटनेच्या कार्यकारिणीची निवडणूक लवकरच होणार असून श्रॉफ यांनी एकता कायम ठेवण्याचे आवाहन केले. ३०-३२ वर्षांपासूनची प्रचलित औषधे वितरणाची व्यवस्था मोडीत काढण्याचे षडयंत्र सध्या सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.