महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा विद्यार्थी चैतन्य महाजन याने बारावी शास्त्र शाखेच्या परीक्षेत उत्कृष्ठ गुण मिळविल्याने त्याला केंद्र शासनाची ८० हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
बारावी विज्ञान शिक्षणानंतर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना विज्ञान विषयात नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी ‘प्रेरणा शिष्यवृत्ती’ दरवर्षी ८० हजार रुपये याप्रमाणे पाच वर्षे त्याला मिळणार आहे. चैतन्यने राज्यस्तरीय सीईटी परीक्षेतही महाविद्यालयात १४७ गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या हस्ते त्यास शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी प्रा. आर. एन. पाटील, प्रा. आर. डी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. आर. पी. भामरे आदी उपस्थित होते.