* सदोष प्रवेशद्वाराचा फेरा कायम
* चक्का जाम होण्याची नववी घटना
* सॅटीसवर क्रेन ठेवण्याची वाहतूक पोलिसांची मागणी
* वाहतूक कोंडीचा फेरा कायमच
वाहतूककोंडी, गर्दीने नेहमीच गजबजलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसराला मोकळा श्वास घेता यावा यासाठी महापालिकेने रेल्वेच्या पुढाकाराने उभ्या केलेल्या ‘सॅटीस’ वाहतूक प्रकल्पाच्या उभारणीत कशा त्रुटी राहून गेल्या आहेत, याचा अनुभव ठाणेकरांनी गुरुवारी रात्री पुन्हा एकदा घेतला. जुन्या एस. टी. डेपोच्या दिशेने सॅटीस पुलावरील बसथांब्याच्या दिशेने येणारी ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाची (टीएमटी) बस बंद पडल्याने मागून येणाऱ्या इतर बसगाडय़ाही पुलाखाली अडकून पडल्या. वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांत पुलाच्या प्रवेशद्वारावर बस बंद पडून झालेल्या वाहतूककोंडीची ही नववी घटना आहे. सीएनजी बसेस् बंद पडताच लॉक होतात. ही कल्पना असल्याने सॅटीस पुलावर कायमस्वरूपी क्रेन ठेवण्यात यावी, असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी टीएमटी व्यवस्थापनाकडे मांडला आहे. मात्र, या प्रस्तावाचीही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे एखादी बंद पडलेली बस कोटय़वधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या सॅटीस प्रकल्पाचा कसा बोजवारा उडवते हे पुन्हा एकदा पाहावयास मिळाले.
 जुन्या एसटी डेपोच्या दिशेने सॅटीस पुलावरील बसथांब्यांच्या दिशेने येणारी ठाणे परिवहन उपक्रमाची सीएनजी बस गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास बंद पडली आणि एकच गोंधळ उडाला. या बसमागे इतर बसगाडय़ांची भलीमोठी रांग लागली. त्यामुळे रडतखडत सुरू असणाऱ्या टीएमटी बसेस्चे वेळापत्रक पुर्णपणे कोलमडले. यामुळे रात्री नऊनंतर घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून वागळे इस्टेट, वर्तकनगर, लोकमान्यनगर, घोडबंदर, लोकपुरम अशा दुरच्या भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सॅटीस पुलावर या प्रवाशांसाठी खास बसथांबे उभारण्यात आले आहेत. येथून उशिरापर्यंत या मार्गावर बसेस् सोडण्यात येतात. गुरुवारी रात्री नऊनंतर या मार्गावरील बसेस्चे वेळापत्रक कोलमडल्यासारखे चित्र निर्माण झाले. सॅटीस पुलाखाली असणाऱ्या रिक्षा थांब्यावर पुरेशा प्रमाणात रिक्षा नसल्याने प्रवाशांचे आणखी हाल झाले. बस बंद पडून गुरुवारी रात्री घडलेला हा प्रकार सॅटीस पुलावरून नेहमीच प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही नवा नव्हता. एसटी डेपोकडून सॅटीस पुलावरील एन्ट्री पॉइंट मुळातच निमुळता आहे. त्यामुळे येथून प्रवेश करताना एखादी बस बंद पडली, तर मागून येणाऱ्या बसगाडय़ांना  पुलावर शिरण्यासाठी पुरेशी जागा नाही. टीएमटीच्या ताफ्यात सध्या मोठय़ा प्रमाणावर सीएनजी बसेस् आहेत. या बसगाडय़ा बंद पडताच लॉक होतात. गुरुवारी सॅटीस पुलाच्या प्रवेशद्वारावर बंद पडलेली बस अशीच लॉक झाली. त्यामुळे धक्का देऊन ती पुढेही नेता येईना. या बसमागे इतर बसगाडय़ांची रांग लागली. त्यामुळे चक्का जाम झाल्यासारखी परिस्थिती या भागात निर्माण झाली. तब्बल ४० मिनिटांच्या कसरतीनंतर वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ही बस बाजूला काढली. त्यानंतर रात्री ११च्या सुमारास टीएमटीच्या रखडलेल्या बसेस्ना वाट मोकळी झाली.
 सॅटीसचे सदोष प्रवेशद्वार लक्षात घेऊन या ठिकाणी २४ तास एखादी क्रेन उभी केली जावी, अशी वाहतूक पोलिसांची जुनी मागणी आहे. मात्र, टीएमटी व्यवस्थापन याकडे ढुंकूनही पाहात नाही. त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ एखादी बस बंद पडताच या ठिकाणी असेच चित्र नेहमी पाहावयास मिळते. या पुलावरून जांभळी नाक्याच्या दिशेने बसगाडय़ांना उतरण्याचा मार्ग आहे. पुलावर यासाठी पुरेशी जागा असली, तरी जांभळी नाक्यावर उतरणीच्या मार्गावर हा मार्ग निमुळता होत जातो. त्यामुळे तेथेही नेहमीच वाहतूककोंडी होत असते. मध्यंतरी ठाणे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात मॉक ड्रिल केले होते. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून केलेल्या या प्रयोगादरम्यान सॅटीस पुलामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. सॅटीस पुलावर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तेथे प्रवेश कसा करायचा हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chakka jam freightage traffic jam bus bus stoptmt bus traffic police
First published on: 08-09-2012 at 08:29 IST