राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची शिक्षण, साहित्य, आरोग्य, कृषी, उद्योग अशा विविध क्षेत्रांच्या विकासाची पायाभरणी केली, त्यामुळे महाराष्ट्राची मान दिल्लीतही उंचावली. त्यांच्या या अफाट कार्याची ओळख युवा पिढीला करुन देणे आवश्यक आहे, असे मत आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच व राज्याच्या आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त नव महाराष्ट्र युवा अभियान, चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व उन्नती फौंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व व सुगम गीत गायन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
श्री. खानदेशे, प्रा. मकरंद खेर यांची यावेळी भाषणे झाली. अभियानचे जिल्हा संघटक किरण काळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनंत काळे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. प्रा. गणेश शिंदे, एस. एस. जाधव, शिवाजी साबळे, बापू चंदनशिवे, गणेश भगत, अभिजित कुलकर्णी, प्रकाश शिंदे, सतीश आचार्य, बाळासाहेब वाईकर, पवन नाईक आदी उपस्थित होते.