वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुजरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कल्याणमधील ‘प्रेमसेवा महिला मंडळा’ने या मुलांना आधुनिक प्रकारचे दप्तर देऊन त्यांना शाळा, अभ्यासाची गोडी लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. शाळेत रंगीबेरंगी दप्तर मिळतेय, खाऊ मिळतोय, गाणी शिकवली जातात; म्हणून मोठय़ा उत्सुकतेने भिवंडी, कल्याण परिसरातील वीटभट्टीवर असलेली ३०० मुले प्रेमसेवा महिला मंडळाच्या वनराईतील शाळेत शिक्षण घेत आहेत.
ठाणे जिल्ह्य़ाच्या वीटभट्टी असलेल्या भागातील अधिकाधिक मुले शाळेत आणण्याचा मंडळाचा प्रयत्न सुरू आहे. ऑक्टोबर महिना संपल्यानंतर जव्हार, मोखाडा, वाडा, शहापूर, मुरबाड, डहाणू, तलासरी भागांतील अनेक आदिवासी कुटुंब भिवंडी परिसरातील पिंपळास, कामण, खारबाव, कल्याणमधील वाडेघर भागात विटा पाडण्याच्या उद्योगासाठी येतात. मे अखेपर्यंत म्हणजे सात ते आठ महिने त्यांचा मुक्काम वीटभट्टीच्या ठिकाणी असतो. या कालावधीत या मजुरांची मुले कुटुंबाची उपजीविका महत्त्वाची असल्याने शाळेकडे पाठ फिरवतात. वीटभट्टीच्या जवळपास शाळा, शिक्षण नसल्याने हुंदडत असतात. या मुलांच्या आई वडिलांना उपजीविकेसाठी दोन पैसे मिळवणे; एवढेच ध्येय असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. मुलांनी शिकावे, मोठे व्हावे अशी या पालकांची इच्छा आहे. पण गांजलेली आर्थिक परिस्थिती पाठ सोडत नसल्याने पालकांचा नाइलाज होतो. वीटभट्टी भागात शासनाच्या वस्ती, भोंगा शाळा असतात तेथील शिक्षक वीटभट्टी मुलांना आपुलकीने शिकवत नाहीत अशा वीटभट्टीवरील पालकांच्या तक्रारी आहेत. वीटभट्टी मुलांना पहिले खाऊ आणि मग अभ्यास या पद्धतीने शिकवावे लागते. जूनमध्ये गावी परतल्यावर ही मुले पुन्हा शाळेत जातात.  सप्टेंबपर्यंत ही मुले शाळेत जातात. पाऊस संपल्यानंतर त्यांना पुन्हा आईबाबांबरोबर वीटभट्टीच्या कामासाठी गाव सोडावे लागते.
 शाळेचा लळा
प्रेमसेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा स्टेला मोराइस यांनी भिवंडी, कल्याण परिसरात अशा मुलांना वीटभट्टी भागात संघटित केले आहे. त्यांना शाळा व शिक्षणाचे महत्त्व कळावे म्हणून या मुलांना आधुनिक दप्तर देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. भिवंडी जवळील पिंपळास येथील वीटभट्टीवरील ४० मुलांना शहीद सुशील शर्मा यांच्या पत्नी राघिनी यांच्या साह्य़ाने दप्तरे देण्यात आली. दप्तरे मिळाल्यापासून मुले नियमित शाळेत येतात, असे स्टेला मोराइस यांनी सांगितले.
मंडळाची बस दररोज सहा खासगी शिक्षिकांसह या मुलांचे तयार भोजन घेऊन वीटभट्टीवर जाते. गाडीच्या आकर्षणाने पण विद्यार्थी जमा होतात. वीटभट्टी भागातील झाडांखाली मुलांची शाळा भरवली जाते. शिक्षिका त्यांना नेमून दिलेल्या कामण, खारबाव, पिंपळास, वाडेघर भागांतील वीटभट्टय़ांवर दिवसभर विद्यार्थ्यांचा अभ्यास, गाणी, गोष्टी सांगून त्यांना शाळेचा लळा लावतात. शरीर, आरोग्याची निगा याविषयी माहिती दिली जाते. शिक्षणामुळे काय होऊ शकते याचे महत्त्व सांगितले जाते. शासकीय मदतीविना हा उपक्रम सुरू आहे, असे स्टेला मोराइस यांनी स्पष्ट केले. या मुलांना बाह्य़जग पाहता यावे म्हणून स्थानिक पोलिस ठाणी, तारांगण, मत्सालय, बँका, महाविद्यालये, मनोरंजनाची ठिकाणी आदी ठिकाणे नेले जाते. आपल्या मुलांनी शिकावे हीच वीटभट्टी वरील अनेक पालकांची इच्छा आहे. वीटभट्टी मालकही या उपक्रमात अडथळे आणत नाहीत, असे सविता देशमुख, चैताली बोराडे या शिक्षिकांनी सांगितले.
अत्याधुनिक दप्तर
पुणे येथील ‘सिम्बॉयसिस’ संस्थेतील विद्यार्थ्यांनी मुलांसाठी अत्याधुनिक दप्तर तयार केले आहे. वीटभट्टी, जंगल भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सर्वाधिक उपयोगी आहे. या दप्तरात पुस्तके, भोजनचा डबा व्यवस्थीत मावतो. शिवाय या दप्तराचा छोटे टेबल किंवा पॅड म्हणून उपयोग करता येऊ शकतो. दप्तराच्या मुठीच्या जागेवर सौर उर्जेवर चालणारा एक छोटा दिवा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी रात्रीच्या वेळेत अभ्यासासाठी या दिव्याचा उपयोग करू शकतील अशी या दप्तराची संकल्पना आहे. वीटभट्टीवरील उर्वरित चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना, शहापूर, मुरबाड भागांतील आदिवासी पाडय़ावरील मुलांना हे दप्तर वाटप करायचे आहे. या दप्तरांसाठी दानशूरांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रेमसेवा महिला मंडळाने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onमुलेChildren
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children on bricks killen step to school with with modern bags
First published on: 01-01-2015 at 01:30 IST