बच्चेकंपनीचा ‘क्रिश’

भारतीय सुपर हीरो चित्रपट असे तीन शब्दांत वर्णन करता येईल असा हा ‘क्रिश थ्री’ चित्रपट थ्रीडीमध्ये न बनविल्यामुळे आणि बॉलीवूडपणामुळे परिणामकारक

भारतीय सुपर हीरो चित्रपट असे तीन शब्दांत वर्णन करता येईल असा हा ‘क्रिश थ्री’ चित्रपट थ्रीडीमध्ये न बनविल्यामुळे आणि बॉलीवूडपणामुळे परिणामकारक नसला तरी क्रिश सुपर हीरोच्या बच्चे कंपनीसाठीच्या बाललीला, उत्तम व्हीएफएक्स तंत्रज्ञानासह चित्रपटाचा वेग आणि क्रिश-काल तसेच म्युटन्ट्स म्हणजे मानवर यांच्याशी क्रिशची अफलातून मारधाड यामुळे हा चित्रपट काहीसा सुसह्य़ ठरतो.
हॉलीवूडमधील सुपर हीरोंच्या चित्रपट मालिका पाहिलेल्या प्रेक्षकांना त्यातील सगळ्या चमत्कृतींची पुनरावृत्ती ‘क्रिश थ्री’ चित्रपटात आहे हे सहजपणे जाणवेल. परंतु, तंत्रसफाईदार सुपर हीरो चित्रपट बनवितानाही मुलगा-बाप यांच्या नात्यांचा बॉलीवूड स्टाईल मसाला दिग्दर्शकाने जोडून काहीसा रसभंग केला आहे. हॉलीवूडप्रमाणेच बॉलीवूडचा तंत्रसफाईदार सुपर हीरो सादर करण्यात चित्रपटकर्ते यशस्वी झाले आहेत. काल, मानवर म्हणजेच मानव आणि जनावर यांचे मिश्रण असलेले एक प्रकारचे ‘एलियन्स’ आणि त्यांचे कारनामे, त्यांच्याशी क्रिशची लढाई, त्याची कथानकातील गुंफण निश्चितच चांगली आहे. परंतु, त्याला बॉलीवूड मेलोड्रामासारखी पटकथेत केलेली गुंफण यामुळे प्रेक्षकाचा त्यातला रस कमी होतो. ‘क्रिश’ लोकांनी पाहिला, त्यापूर्वी ‘कोई मिल गया’मधील ‘जादू’ या संकल्पनेने प्रेक्षकांवर जादूच केली होती. ‘रा-वन’नंतर आलेला ‘क्रिश थ्री’ पाहायला जाण्यापूर्वी प्रेक्षकांची अपेक्षा हॉलीवूड स्टाईलचा सुपर हीरो बघायला मिळेल अशी होती. पण, दिग्दर्शकाने संपूर्णपणे भारतीय अवतारातील सुपर हीरो दाखवायचा म्हणून कथानकाला भावनिक रूप दिले. त्यामुळे चित्रपट फसला आहे. सुपर हीरो चित्रपटातील गाण्यांमुळे कथानकाला बाधा येते. त्यामुळेही रसभंग होतो.
चित्रपटातील रोहित मेहरा हा डॉक्टर आहे आणि तो अनेक रोगांपासून मानवाला वाचविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतो. त्याचा मुलगा कृष्णा आहे आणि तो सुपर हीरो बनल्यानंतर ‘क्रिश’ होतो. ‘काल’ हा विज्ञान चमत्कृतीचे उत्पादन असलेला मानव आहे. तो स्वत:च्या शोधासाठी जग नष्ट करायला निघाला आहे. त्याने मानवर तयार केले आहेत. प्राणी आणि मानव यांचे मिश्रण असलेले मानवर परकाया प्रवेश करू शकतात. विवेक ओबेरॉयने ‘काल’ची व्यक्तिरेखा साकारली असून मानवर असलेली ‘काया’ ही व्यक्तिरेखा कंगना राणावतने साकारली आहे. सुष्टांचा दुष्टांवर विजय, जग नष्ट करायला निघालेल्या खलप्रवृत्तीचा सुपर हीरो नायनाट करतो हीच संकल्पना सुपर हीरोंच्या अनेक चित्रपटांप्रमाणे इथेही आहे. त्याला भावनिक मुलामा देऊन भारतीय पद्धतीचा सुपर हीरो चित्रपट दिग्दर्शकाने साकारला आहे. प्रत्येकामध्ये क्रिश असतोच हे ठसविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. एका दृश्यामध्ये एक छोटा मुलगा तारा आणि वायरिंमध्ये अडकलेल्या कबुतराची सुटका करताना स्वत: अडकतो आणि तेरा मजल्याएवढय़ा उंचावरून खाली पडतो आणि क्रिश त्याला वाचवितो. या प्रसंगात क्रिश त्या छोटय़ा मुलाला म्हणतो की तू चांगले काम केलेस, स्वत:चा जीव धोक्यात घालून कबुतराचा जीव वाचविलास म्हणजेच माझ्यासारखाच तू पण क्रिश आहेस.  अशा पद्धतीने क्रिश प्रत्येकामध्ये असतो हे ठसविले आहे. सुपर हीरोचे हे भारतीयकरण पटणारे आहे. परंतु, अनेक ठिकाणी मेलोड्रामासारखा भावनिक स्पर्श देण्याचा प्रयत्न केल्याने प्रेक्षकाला ते पटले तरी रुचत नाही. कारण हॉलीवूड स्टाईल पडद्यावर पाहायला मिळेल ही त्याची अपेक्षा चित्रपट पूर्ण करू शकत नाही.
व्हीएफएक्सच्या बाबतीत चित्रपट खूपच सफाईदार झाला असला तरी थ्रीडीमध्ये सुपर हीरोच्या करामती पाहताना प्रेक्षकांची अधिक करमणूक करता आली असती. अभिनयाच्या पातळीवर अर्थातच सुपर हीरो, कृष्णा आणि रोहित मेहरा या तिन्ही भूमिकांमध्ये हृतिक रोशन भाव खाऊन जातो. प्रियांका चोप्राला फारसा वाव नाही. परंतु, कंगना राणावतने साकारलेली मानवरची भूमिकाही भाव खाऊन जाते. उत्तम व्हीएफएक्ससाठी चित्रपटाला नक्कीच गुण द्यावे लागतील.  हृतिकच्या चाहत्यांसाठी आणि त्यातही बच्चे कंपनीसाठी बनविलेला हा चित्रपट ठरतो. ‘क्रिश २’ न येता थेट ‘क्रिश ३’ आला. चित्रपटाच्या शेवटी क्रिशचा मुलगा जन्म घेतो असे दाखवून ‘क्रिश ३’ नंतर ‘क्रिश ४’ किंवा कदाचित थेट ‘क्रिश ५’ चित्रपट येईल, अशी शक्यताही दिग्दर्शकाने निर्माण करून ठेवली आहे.
क्रिश थ्री
निर्माता-दिग्दर्शक – राकेश रोशन
पटकथा – हनी इराणी, रॉबिन भट, राकेश रोशन
संगीत – राजेश रोशन
कलावंत – हृतिक रोशन, कंगना राणावत, प्रियांका चोप्रा, विवेक ओबेरॉय, नासिरुद्दीन शहा, राजपाल यादव, अरिफ.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Childrens krish