राज्यातील मान्यताप्राप्त शाळांमधील शिशुवर्ग प्रवेशासाठी शासनाने आर्थिक दुर्बल, तसेच वंचित घटकांसाठी २५ टक्के कोटा लागू केला असला तरी, या घटकातील पालकांचा ठरावीक नामांकित शाळांकडेच ओढा असल्याचे यंदाच्या प्रवेश प्रकियेतून समोर आले आहे. ठाणे शहरात शासनाचा २५ टक्के कोटा लागू असलेल्या सरस्वती, डीएव्ही, वसंत विहार आदी मोजक्या नामांकित ब्रॅण्डेड शाळांनाच पालकांनी पसंती दिली असून ६४ शाळांकडे सपशेल पाठ फिरवली आहे.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांमधील पालक पूर्वी भरमसाट खर्चामुळे इंग्रजी माध्यमातील शाळांकडे सहसा फिरकत नसत. मात्र गेल्या काही वर्षांपासून आर्थिक दुर्बल तसेच वंचित घटकांसाठी शिशुवर्ग प्रवेशासाठी शासनाने मान्यताप्राप्त शाळांमध्ये २५ टक्के कोटा लागू केला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा गरीब मुलांनाही मान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेश मिळू लागला आहे. असे असले तरी, या प्रवेश प्रक्रियेमध्येही पालकांचा ओढा आता ब्रॅण्डेड शाळांकडे वाढू लागला आहे. यंदा शिशुवर्ग प्रवेशप्रक्रियेसाठी ठाणे शहरातील सरस्वती, डीएव्ही, वसंत विहार, आर्किड या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पालकांनी पसंती दिली आहे. शासनाने लागू केलेल्या २५ टक्के कोटय़ातून आपल्या पाल्याला याच शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी पालकांचा आग्रह असल्याचे प्रवेश अर्जावरून समोर आले आहे. विशेष म्हणजे, या शाळांच्या ओढामुळे २५ टक्के कोटा लागू असलेल्या सुमारे ६४ शाळांकडे पालक फिरकलेच नसल्याचे समोर आले आहे. या ६४ शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याच्या शिशुवर्ग प्रवेशासाठी अर्ज भरलेले नाहीत, अशी माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी दिली.

इंग्रजी तितुकेच मेळवावे
त्यातही ‘चांगले शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यमातील शिक्षण’ हा गैरसमजही दृढ होत असल्याचे या कोटय़ातील प्रवेशप्रक्रियेवरून दिसून आले आहे. कारण इंग्रजी माध्यम शाळेतील प्रवेश प्रक्रियेसंबंधी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रारी आल्या आहेत. मात्र, मराठी माध्यम शाळेतील प्रवेशप्रक्रियेची एकही तक्रार आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.