मानसशास्त्रातील आधुनिक विचार, नवनवीन संशोधन पद्धती, प्रायोगिक आराखडे, निष्कर्ष अशा सर्व विषयांवर येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात पुण्याचे विद्यापीठ विकास मंडळ यांच्या वतीने मानसशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘संशोधन पद्धती आणि संशोधनातील एकजीनसीपणा’ या विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांनी मंथन केले. राज्यातील १५० प्रतिनिधी आणि ४० वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक या चर्चासत्रास उपस्थित होते.
संशोधन म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे सिद्धांत. एखादा सिद्धांत निर्माण करायचा असेल तर वेगवेगळ्या संशोधन पद्धतीचा बारकाईने अभ्यास करावा लागतो हाच उद्देश या चर्चासत्राचा होता. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी पुणे विद्यापीठातील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. आर. शेजवळ, डॉ. पी. एच. लोधी, प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, महात्मा गांधी विद्यामंदिरचे डॉ. अपूर्व हिरे, प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. एम. ए. भारद्वाज, डॉ. आर. पी. भामरे, डॉ. एन. बी. पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. शिंदे यांनी स्वागत केले.
उद्घाटनानंतर डॉ. शेजवळ यांनी मानसशास्त्रीय संशोधन पद्धतीतील आधुनिक विचार प्रवाह या विषयावर व्याख्यान दिले. डॉ.  लोधी यांनी घटक विश्लेषण या विषयावर, तर प्रा. सी. ओ. बडगुजर यांनी तत्सम प्रायोगिक आराखडय़ावर मत मांडले. डॉ. रसाळ यांनी संशोधन प्रस्ताव आणि संशोधनातील टप्पे उलगडून दाखविले. प्राचार्य डॉ. भारद्वाज यांनी गुणात्मक आणि संख्यात्मक विश्लेषण हा विषय स्पष्ट केला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विभागाचे संचालक डॉ. उमेश राजदेरकर यांनी सामाजिक शास्त्रातील संशोधन या विषयावर, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागप्रमुख व प्राचार्य डॉ. एच. जे. नरके यांनी घटक आराखडा हा विषय समजावून सांगितला. दुपार सत्रात अहमदनगर महाविद्यालयातील डॉ. पी. सी. बेदरकर यांनी संशोधन पद्धतीतील बारकावे, पाचवडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील डॉ. एजाज शेख यांनी दुर्मीळ अशा मेटा विश्लेषण या विषयावर, डॉ. व्ही. आर. शिंदे यांनी पूर्वकालीन आणि दीर्घकालीन संशोधन पद्धती यांचा आढावा घेतला. विद्यार्थी आणि मार्गदर्शक संशोधनातील एकजीनसीपणा या विषयावरील परिसंवादात डॉ. ए. एम. बच्छाव, डॉ. भारद्वाज, डॉ. बेदरकर, डॉ. शेख, डॉ. शिंदे यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
समारोपात डॉ. रमेश वानखेडे यांनी आंतरविद्याशाखीय संशोधनावर विचार मांडले. डॉ. जगदाळे यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. शिंदे यांनी दोन दिवसांच्या चर्चासत्राचा आढावा घेतला. प्रा. जे. ए. सोदे यांनी आभार मानले. लीना चक्रवर्ती यांनी सूत्रसंचालन केले.