उरणला डावलल्याने संतप्त नागरिकांची भूमिका
सिडकोने पनवेल, खारघर, नेरुळ तसेच उलवे या सिडकोच्या परिसरांत सुपर स्पेशलिटी रुग्णालय उभारण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सिडकोने उरण तालुक्याला मात्र सुपर स्पेशलिटी रुग्णालयाची आवश्यकता असताना डावलल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. यातच उरणमध्ये सरकार रुग्णालय उभारेल, असे स्पष्टीकरण अधिकारी देत असल्याने सिडकोनेच रुग्णालय उभारावे, अशी भूमिका आता नागरिकांनी घेतली आहे.
उरण तालुक्यातील वाढलेल्या अवजड वाहनांमुळे दररोज किमान एक तरी अपघात होत असून अपघात झाल्यानंतर अपघाग्रस्त रुग्णावर तातडीचे उपचार करण्यासाठी उरण तालुक्यात कोणतीच सोय नसल्याने अशा रुग्णांना उपचारासाठी वाशी किंवा मुंबई गाठावी लागत आहे. यात अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी जातो. दरम्यान उपचाराअभावी अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच सिडकोच्याच विकासाच्या आराखडय़ानुसार उरण तालुक्यात मोठय़ा प्रमाणात नागरीकरण वाढू लागले आहे. त्यामुळे उरणमधील लोकसंख्येतही वाढ होऊ लागली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वैद्यकीय सुविधा अपुरी असल्याने  सिडको प्रशासनाने रुग्णालयाची उभारणी करावी, अशी मागणी उरणमधील विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी केली आहे. तसेच खास करून या परिसरातील अपघातांची संख्या लक्षात घेता तालुक्यात तातडीच्या उपचाराकरिता ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्याचीही मागणी करण्यात आलेली आहे.