ओएनजीसीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआयएसएफ जवानाचे अपहरण होऊन चोवीस तासांपेक्षा कालावधी लोटला असला तरी अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. न्हावाशेवा पोलीस, सीआयएसएफचे दीडशे जवान आणि श्वान पथक या जवानाचा शोध घेत आहेत. या संदर्भात पोलिसांनी अपहृत जवानाच्या कुटुंबीयांशी देखील संपर्क साधला आहे. सोमवारी ओएनजीसी तेल शुद्धीकरण प्रकल्पातून मुंबईतील प्रकल्पांच्या तेल व गॅसपुरवठा वाहिन्यांच्या सुरक्षेसाठी जेएनपीटी बंदराच्या परिसरात उभारण्यात आलेल्या मनोऱ्यावर पहारा देणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)च्या वासुराम साईदा या जवानाचे अपहरण झाल्याची तक्रार न्हावाशेवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. या जवानाच्या अपहरणामुळे या परिसरातील पोलिसांची कुमक वाढविण्यात आलेली असून उरणच्या औद्योगिक परिसरात प्रथमच अशी घटना घटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जवानाच्या अपहरणाच्या सलग दुसऱ्या दिवशीही शोध मोहीम सुरू होती. तसेच कदाचित तो मूळ गावी निघून गेला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत असल्याने पोलिसांनी या दृष्टीने त्याच्या कुटुंबीयांशी देखील संपर्क साधला, मात्र तेथेही तो नसल्याने यंत्रणा अधिक चिंतेत पडली आहे.