महापालिकेच्या वसुंधरा महोत्सवातील रोपे जळून गेल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक गणेश भोसले यांनी केला असला तरीही यातील ८५ टक्के रोपे अद्यापी जिवंत असल्याचा दावा महापौर शीला शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणीनंतर केला.
भोसले यांनी सर्वसाधारण सभेत केलेल्या या आरोपानंतर महापौर श्रीमती शिंदे यांनी मनपा वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य मालनताई ढोणे, संगीता खरमाळे, सुमन गंधे, तसेच सुरेश खामकर, मंदार साबळे यांच्यासह वृक्षाधिकारी यु. जी. म्हसे यांना घेऊन ज्याज्या ठिकाणी वृक्षारोपण केले तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या महोत्सवात मनपाच्या मालकीच्या मोकळ्या भुखंडांवरही वृक्षारोपण करण्यात आले. त्यात्या परिसरातील नागरिकांना हे वृक्ष दत्तक म्हणून देण्यात आले व त्यांच्या निगराणीची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. त्यांनी ती उत्तम पद्धतीने पार पाडली असल्याचेही या पाहणीत निदर्शनास आल्याचे महापौरांनी म्हटले आहे.
सावेडी जाँगिंग ट्रॅक, तांबटकर मळा, गणेश कॉलनी, सिद्धीविनायक कॉलनी, शाहू नगर, पटवर्धन सभागृह परिसर अशा अनेक ठिकाणी महापौरांसह सर्वानी पाहणी केली. यापुढे उन्हाळ्यात वृक्षांना पाणी देण्याची गरज आहे. त्यासाठी मनपा पाण्याच्या टँकरची स्वतंत्र व्यवस्था करत आहे असे महापौरांनी सांगितले.