लोकसभा निवडणुकीत ठाण्याचा गड सर करण्यासाठी एकीकडे शिवसेना नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असताना ठाणे शहरातील भारतीय जनता पक्षातील मतभेदांनी टोक गाठले असून विद्यमान अध्यक्ष मिलिंद पाटणकर यांच्याविरोधात पक्षाच्या एका मोठय़ा गटाने नुकताच मेळावा घेत रणिशग पुकारल्याने मित्रपक्षातील मतभेद मिटवताना शिवसेना नेत्यांना अक्षरश: घाम फुटला आहे. ठाणे महापालिका परिवहन सभापती निवडणुकीत दगा केल्याचा आरोप करत भाजपच्या काही नगरसेवकांनी स्वपक्षाचे उपमहापौर आणि विद्यमान शहर अध्यक्ष मिलिंद पाटणकर यांना बेदम चोप दिल्याचा प्रकार मध्यंतरी घडला होता. त्यानंतरही अध्यक्षपदी कायम राहिलेल्या पाटणकर यांनी स्वत:च्या अधिकारात जाहीर केलेली कार्यकारणी वादाच्या भोवऱ्यात सापडली असून पक्षाच्या सात नगरसेवकांनी थेट बंडाचे शीड उभारल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा सावळागोंधळ पुढे आला आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजप या दोन पक्षांची युती असून भाजपमधील सुंदोपसुंदीमुळे येथील सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान शिवसेनेपुढे निर्माण झाले आहे. भाजपचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद पाटणकर यांना पक्षातील नगरसेवकांच्या एका मोठय़ा गटाचा विरोध आहे. उपमहापौरपद हातचे गेल्याने इतके दिवस शांत असणारे पाटणकर गेल्या काही दिवसांपासून पक्षात पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्याचा चंगच बांधला आहे. कळवा येथील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना गळाला लावत पाटणकर यांनी भाजपमध्ये आणले आणि आपण पक्षासाठी काहीतरी करतो आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पाटणकर यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. चार दिवसांपूर्वी त्यांनी पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर करत असताना माजी अध्यक्ष संदीप लेले आणि पक्षाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले अशा दोघांना या प्रक्रियेतून पूर्णपणे डावलले. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर लेले, वाघुले गट सक्रिय झाला असून ‘पाटणकर राष्ट्रवादीचे हस्तक आहेत’, असा आरोप करत त्यांनी पक्षाचा वेगळा मेळावा आयोजित केल्याने गटातटाचे राजकारण जोरात सुरू झाले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात युतीच्या प्रचारासाठी पाटणकर आग्रही नाहीत, असा आरोप करत या मेळाव्यात भाजपच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना पाचारण केले. त्यामुळे पाटणकर यांचा गट नाराज झाला असून देशभरातील भाजपचे कार्यकर्ते मोदी जप करण्यात मग्न असताना ठाण्यातील भाजपची तऱ्हा न्यारी असल्याची चर्चा रंगली आहे.