एकीकडे चांगले शिक्षण घेऊनही युवकांना रोजगार मिळत नाही, तर दुसरीकडे उद्योजकांना तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होत नाही ही परिस्थिती बदलण्यासाठी त्या दृष्टीने कौशल्य विकासाचा कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्या संयुक्त विद्यमाने येथील झुलेलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क’ या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अविनाश पंत. प्रा. एस.एस. मन्था, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, जेआयटीचे अध्यक्ष महेश साधवाणी, सचिव वीरेंद्र कुकरेजा तसेच व्हीएनआयटीचे प्रमुख डॉ. व्ही.आर. जामकर उपस्थित होते. देशात ६५ टक्के युवकांची संख्या असून त्यांच्यामध्ये कौशल्य विकास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असून शालेय स्तरापासून शिक्षणासोबतच कौशल्य विकास कार्यक्रमाची आखणी केल्यास तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होईल व कौशल्यानुसार युवकांना रोजगारही उपलब्ध होईल. त्यासाठी शाळा-महाविद्यालयामध्ये शिक्षणासोबतच कौशल्य विकासाचे शिक्षण देण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ऊर्जा निर्मितीसह इतर सर्व उद्योगामध्ये स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमता विकसित करण्यासाठी उद्योजकांनी स्थानिक विकासासाठी असलेल्या राखीव निधीतून कौशल्य विकास कार्यक्रम राबविल्यास युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी तंत्रशिक्षण क्षेत्रातील संस्थांनी रोजगारावर आधारित शिक्षण हे आव्हान स्वीकारावे, असे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांनी यावेळी सांगितले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अविनाश पंत यांनीही औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रशिक्षण महाविद्यालयासोबतच अभियांत्रिकी महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असताना २० मंत्रालयीन विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार आशीष देशमुख, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, राज्य तंत्रशिक्षण बोर्डाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, कोषध्यक्ष जयप्रकाश सहजरामानी, प्राचार्य डॉ. एस.एस. लिमये, प्रमोद वैरागडे, माधवी वैरागडे, प्रमोद पामपटवार, विविध क्षेत्रातील प्रतिनिधी, उद्योजक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.