महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘विद्यार्थी परिषदे’च्या खुल्या निवडणुकांना हिरवा कंदील मिळणार, यामागे एक वर्षांने होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची पाश्र्वभूमी असल्याची जोरदार चर्चा आहे. २०१४ हे निवडणुकीचे वर्ष असल्याने महाविद्यालयीन निवडणुका त्याची रंगीत तालीम ठरतील. म्हणूनच लवकरात लवकर महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तसे झाल्यास सर्वच राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांच्या मोठय़ा ताकदीबरोबरच प्रचंड मोठय़ा प्रमाणावर पैसा महाविद्यालयीन निवडणुकीमध्ये ओतला जाईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. मुळात आतापर्यंत विझलेल्या खुल्या निवडणुकांची चर्चा सुरू केलीच तीच मुळी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’ने. ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’सारखी विद्यार्थी संघटनाही सातत्याने खुल्या निवडणुकांची मागणी करते आहे; पण ‘मनी’ आणि ‘मसल’च्या ताकदीवर ही मागणी टिपेला नेण्याचे काम राष्ट्रवादीने केले. गेले वर्षभर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेली ही चर्चा इतर राजकीय पक्षही सकारात्मकपणे पुढे नेत आहेत हे विशेष. आतापर्यंत प्राचार्याचा निवडणुकांना विरोध असायचा, पण मुंबईतील जवळपास ३६० महाविद्यालयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य संघटना’ या प्राचार्याच्या संघटनेनेही निवडणुकांवर हरकत घेतलेली नाही. त्यातून उच्चशिक्षण विभागही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. सर्व बाजूंनी असे अनुकूल वातावरण असताना या वर्षीपासूनच खुल्या निवडणुकांचे सूप महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांमध्ये वाजेल अशी अपेक्षा आहे. तसे झाल्यास या निवडणुकांत सर्वच राजकीय पक्ष ताकदीनिशी उतरतील असा अंदाज आहे. लिंगडोह समितीने खुल्या निवडणुकांच्या बाजूने कौल देताना हिंसाचार व गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने आचारसंहिता ठरवून दिली आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराने केवळ पाच हजार रुपये खर्च करावा, छापील पत्रकांऐवजी हाताने तयार केलेल्या पत्रकांचा वापर करावा, निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षाच्या नेत्यांना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश नसावा, अशी अनेक बंधने घालून दिली आहेत. मात्र, ही बंधने झुगारून राजकीय पक्षच महाविद्यालयीन निवडणुकांच्या निमित्ताने आपली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची पोळी भाजून घेतील, असा अंदाज एका सिनेट सदस्याने व्यक्त केला.
राजकीय हस्तक्षेप नसावा
खुल्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय पक्षांचा महाविद्यालयातील हस्तक्षेप वाढतो. आचारसंहितेने किंवा ठराविक नियमावलीने तो जर टाळता येत असेल तर निवडणुकांना विरोध असण्याचे काहीच कारण नाही.
माधवी पेठे, प्राचार्य, डहाणूकर महाविद्यालय
निवडणुका हव्याच
विद्यार्थ्यांमधील नेतृत्त्वगुण विकसित करणाऱ्या व्यवस्थेला प्राचार्यानी विरोध करण्याचे काहीच कारण नाही. प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळतानाही नेतृत्त्वाची गरज असते. मग हे गुण विकसित करणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुकांना प्राचार्याचा विरोध कशाला?
टी. ए. शिवारे, अध्यक्ष,
अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य संघटना
व्यक्तिमत्त्व विकास होईल!
सर्वसामान्य कुटुंबातील तरूणांना राजकारणाची कवाडे खुली करण्यासाठी महाविद्यालयीन निवडणुका हव्याच. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना होईलच. यात सहभागी होऊन त्यांचाही विकास होणार आहे. आपल्याकडे १८ वर्षांपुढील सर्वानाच मतदानाचा अधिकार आहे. लोकशाहीची हीच व्यवस्था महाविद्यालयात रूजली तर काय हरकत आहे?
नीलेश राऊत, प्रदेशाध्यक्ष,
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष
आचारसंहितमुळे हिंचाचार टळेल!
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मुल्ये रूजविण्यासाठी महाविद्यालयात खुल्या निवडणुका होणे आवश्यक आहे. निवडणुकांमध्ये महाविद्यालयांमध्ये हिंसाचार होतो तर त्याला बंदी हा पर्याय असू शकत नाही. आचारसंहितेमुळे या गोष्टी टाळता येतील.
डॉ. भाऊसाहेब जिरपे, एसएफआय
राजकीय हस्तक्षेप होणारच!
* तरूणांमध्ये नेतृत्त्वगुण रूजविण्यासाठी निवडणुका हव्या. अर्थात त्यापासून राजकीय पक्ष लांब कसे राहू शकतील? सध्याच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत नाही का? मग तो खुल्या निवडणुकांमध्ये झाला तर त्याला आक्षेप कशाला?
प्रदीप सावंत, युवा सेना
निवडणुकीची आचारसंहिता
* प्रत्येक उमेदवाराला पाच हजार रुपये खर्चाची मर्यादा
* हा खर्च उमेदवाराने विद्यार्थ्यांकडून देणगी स्वरूपात जमा करावा
* छापील ऐवजी हाताने तयार केलेल्या पत्रकांचा वापर
* उमेदवाराला वर्गात ७५ टक्के हजेरी बंधनकारक
* निवडणूक देखरेख समितीचा वचक असावा
* वर्ग सुरू झाल्यानंतर सहा ते आठ आठवडय़ात निवडणूक घ्यावी
* अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची निवडणुकीची प्रक्रिया दहा दिवसात दिवसात पूर्ण करावी
* निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेशबंदी
* विद्यार्थ्यांच्या गटांनी कुठे बैठका घ्याव्या याचे नियम प्राचार्य ठरविणार