राज्य सरकारने जनतेसाठी केलेल्या अनेक विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यात कार्यकर्ते कमी पडत आहेत. बोलणाऱ्याची या जगात मातीदेखील विकली जाते, पण न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही, अशी खंत पालकमंत्री गणेश नाईक यांनी घणसोली येथील एका कार्यक्रमात व्यक्त केली. पालिका आणि शासनाच्या वतीने घणसोली येथील सावळी गावाजवळ मनोरंजन आणि विज्ञान याचा मेळ घालणारे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. ४५ हजार चौमी क्षेत्रफळाच्या या पार्कसाठी आमदार संदीप नाईक यांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. मोरबे धरण, अद्यावत मुख्यालय, आधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, ठाणे बेलापूर रस्त्याचे काँक्रीटीकरण याचबरोबर लोकांच्या मनोरंजनासाठी नेरुळ येथील वंडर पार्कनंतर आता सेंट्रल पार्क उभारण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. उद्यानासाठी शासनाकडून चार कोटीचे अनुदान प्राप्त करण्यात आल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. उद्यानात आगरी कोळी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी शिल्पे व स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके उभारली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. विकास पाच टप्यात होणार असून त्यावर पहिल्या टप्यात १४ कोटी ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp government development work unable to reach towards voters
First published on: 20-08-2014 at 06:55 IST