मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नगरकरांना सध्या रिमझिम पावसावरच समाधान मानावे लागत आहेत. गेल्या दोन, तीन दिवसांपासून अपवाद वगळता जिल्हाभर भुरभुर सुरू असली तरी भिजपाऊस म्हणून शेतकरीही सुखावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंतच जिल्ह्य़ात सर्वत्र यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे.
राज्यात विशेषत: मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार वृष्टी सुरू असताना जिल्ह्य़ात मात्र मृगाच्या मोठय़ा पावसाची प्रतीक्षाच आहे. मान्सूनपूर्व काळात दमदार पावसाने जिल्ह्य़ात हजेरी लावली. सर्वच तालुक्यांमध्ये हा कमी-अधिक पाऊस झाला, मात्र मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्य़ात प्रतीक्षाच सुरू आहे. नगर शहर व परिसरात कालपासून (रविवार) गच्च पावसाळी वातावरण असतानाही रिमझिम पावसावर समाधान मानावे लागत आहे. रविवारी दिवसभर ही भुरभुर सुरू होती, आजही सकाळपासूनच हलक्या सरी सुरू आहेत. सुमारे दान महिन्यांची उन्हाळ्याची सुटी संपल्यानंतर आज बहुसंख्य शाळा सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी रिमझिम पावसाने का होईना हजेरी लावल्यामुळे बच्चे कंपनीने शाळेच्या पहिल्याच दिवशी रेनकोट, छत्र्यांच्या  आनंद लुटला.
जिल्ह्य़ात जून महिन्याच्या सरासरीच्या ९५ टक्के, तर एकुणात १९ टक्के पावसाची नोंद आत्तापर्यंत झाली आहे. पाथर्डी व कर्जत वगळता काल (रविवार) जिल्ह्य़ात सर्वत्र पाऊस झाला, मात्र त्याचे स्वरूप हलक्या सरींचेच होते. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्य़ात झालेल्या पावसाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. हे आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. पहिल्या कंसातील आकडे यंदाच्या आत्तापर्यंतच्या पावसाचे, तर दुसऱ्या कंसातील आकडे गेल्या वर्षीचे आहेत. आहेत. नगर- ३.४ (८९), (२.२), पारनेर- १२ (१०६), (२२), पाथर्डी- काल पाऊस नाही (२५), (१), शेवगाव- २ (५९), (९), संगमनेर- २३ (९४), (२), कोपरगाव- ४ (१०५), (६२), अकोले- ७० (१२७), (गेल्या वर्षी निरंक), श्रीरामपूर- ७ (८७), (३२.४), राहाता- ६.२ (२३५), (१३१), राहुरी- ८.४ (५०), (३७), नेवासे- ३ (४२), (२६), कर्जत- काल पाऊस नाही (१३२), (गेल्या वर्षी निरंक), जामखेड- १ (६२), (१९) आणि श्रीगोंदे- २ (१५२), (गेल्या वर्षी निरंक).
धरणातील पाणीसाठे
सर्व आकडे दशलक्ष घनफुटात आहेत. कंसातील आकडे गेल्या वर्षीचे या वेळचे आहे. भंडारदरा- (क्षमता ११ हजार ०३९)- सध्याचा साठा- ८५९ (मागील वर्षांचा साठा- ५१४), मुळा- (क्षमता २६ हजार)-५ हजार ४८४ (४ हजार २२७), निळवंडे- (क्षमता ४ हजार २३७)-६२९ (४९०), आढळा- (क्षमता १०६०)-१४९ (११५), मांडओहळ- (क्षमता ३९९)-१९.७९, घाटशीळ पारगाव- (क्षमता ४४०)-निरंक (निरंक), घोड- (क्षमता ७ हजार ३३९)-४७७ (२ हजार ४९), खैरी- (क्षमता ५३३)-१.३३ (४९) आणि सीना- (क्षमता २ हजार ४००)-१०३ (निरंक)