दुष्काळी तालुक्यातील जनतेचे स्थलांतर रोखण्यासाठी तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. राज्यात पाण्यावर मोठा खर्च करण्यात येत असून, यापुढेही पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. वेळप्रसंगी दिल्लीतून भरीव निधी उपलब्ध केला जाईल. यावर्षी पाणीपुरवठा आणि जलसंधारण या कामांवर अधिक भर दिला असून, इतर कामे तात्पुरती थांबवून दुष्काळी तालुक्यांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घेतली असल्याचे सांगताना, शासनाच्या भूमिकेला साथ द्या, सहकार्याची भूमिका ठेवा असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
श्री क्षेत्र पुसेगाव येथे सेवागिरी महराजांच्या ६५ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार उदयनराजे भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, डॉ. सुरेशराव जाधव यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील १२ प्रगतशील शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सेवागिरी कृषिभूषण पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले.   
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट असून, अनेक तालुक्यातील धरणे कोरडी पडली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून उद्योग व शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या पाणीसाठय़ात कपात करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. दुष्काळी जनतेला न्याय देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. तरी या प्रयत्नांना यश व गती देण्याची शक्ती परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांनी आम्हाला द्यावी, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी घातले. सेवागिरी देवस्थान ट्रस्टला यावर्षी तातडीने दीड कोटी रुपये विकासनिधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, कोयना भूकंपानंतर विस्थापित झालेल्या शासकीय विद्यानिकेतनचे पुनर्वसन पुसेगाव येथे करण्यात आले. येथील ग्रामस्थांनी उत्स्फूतपणे ११७ एकर जमीन व तीन लाख रुपये दिले होते. या जमिनीपैकी ३२ एकर जमिनीची मागणी सेवागिरी देवस्थानने केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा करून मी ही जागा देण्यात यावी अशी शिफारस केली होती. त्यावेळी ट्रस्टने तालुका क्रीडा संकुल बांधून देण्याची अट अधिकाऱ्यांनी घातली होती. ती शिथिल करण्यासाठी पावले उचलली जातील.
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, सेवागिरी यात्रेस येणारे बहुतांश शेतकरी असतात. त्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान व उपयुक्त माहिती उपलब्ध होण्यासाठी येथे शेती माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. वखार महामंडळाच्या वतीने पुसेगाव येथे उभारण्यात येत असलेल्या शीतगृह व गोदामामुळे शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहक व व्यापाऱ्यांना विकता येणार आहे.
सतेज पाटील म्हणाले की, सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाने शेतकरी हैराण झाला आहे. सिमेंट बंधारे शेततळी तसेच चारा छावण्या सुरू करून दुष्काळग्रस्तांना आधार देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
जयकुमार गोरे म्हणाले की, जिहे-कठापूर सिंचन योजना खटाव-माण तालुक्यांतील जनतेच्या अस्तित्चाचा प्रश्न आहे. श्वेतपत्रिकेनंतर या योजनेविषयी शंका निर्माण झाली आहे. शासनाने ही योजना तातडीने मार्गी लावावी अशी लोकांची अपेक्षा आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी राजकीय ताकद पणाला लावावी.
प्रास्ताविक डॉ. सुरेशराव जाधव यांनी केले.