चारित्र्य पडताळणीचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा म्होरक्या पोलीसच

सुरक्षारक्षकांना बोगस चारित्र्य पडताणी प्रमाणपत्र पुरिंवणारी टोळी तुर्भे एमआयडीसी पोलिसांच्या दक्षतेमुळे उघडकीस आली आहे. या टोळीचा म्होरक्या पोलीस हवालदारच असल्याने पोलीस यंत्रणादेखील चक्रावली

सुरक्षारक्षकांना बोगस चारित्र्य पडताणी प्रमाणपत्र पुरिंवणारी टोळी तुर्भे एमआयडीसी पोलिसांच्या दक्षतेमुळे उघडकीस आली आहे. या टोळीचा म्होरक्या पोलीस हवालदारच असल्याने पोलीस यंत्रणादेखील चक्रावली आहे. या टोळीने जून २०११ ते जानेवारी २०१४ या कालावधीत एकाच सुरक्षा एजन्सीतील सुमारे ६५९ सुरक्षारक्षकांना बोगस चारित्र्य प्रमाणपत्र पुरविल्याचे समोर आले आहे. या टोळीत सहभागी असलेल्या सुरक्षा एजन्सीमधील दोन कर्मचारी आणि एका मध्यस्थीला पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्याकडून तुर्भे पोलीस ठाण्याचे बनावट रबरी शिक्के जप्त केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूक गुन्हा दाखल केलेला आहे.
एपीएमसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दिलीप खोसे हा बनावट शिक्क्य़ाच्या माध्यमातून बोगस चारित्र्य प्रमाणपत्र तयार करीत होता. सीबीडी येथील निसा सिक्युरिटी सुरक्षा एजन्सीतील ६५९ सुरक्षारक्षकांना बोगस चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात आली होती. यासाठी प्रत्येकाकडून ७०० रुपये घेण्यात आले होते. याप्रमाणे ४ लाख ६१ हजार ३०० रुपयांची माया त्याने जमा केली आहे. या कामामध्ये एजन्सीमधील विभाग व्यवस्थापक वीरबहादूर राय आणि संगणकचालक मनोहर मोर्या यांचादेखील समावेश होता. राय याची ऐरोलीतील शहाजी ज्ञानू पाटील याच्या माध्यमातून एपीएमसी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दिलीप खोसे याच्याशी ओळख झाली होती. एजन्सीमध्ये कामावर नव्याने रुजू होणाऱ्या सुरक्षारक्षकाकडून मोर्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची मागणी करीत. प्रमाणपत्र नसलेल्या रक्षकांकडून ते तयार करून देण्यासाठी ७०० रुपये घेत. यानंतर राय खोसे याच्याकडून प्रमाणपत्र तयार करून घेत. प्रमाणपत्र तयार करण्याठी खोसे तुर्भे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस ठाण्याचे बनावट शिक्क्य़ांचा वापर करीत होता. मात्र एका प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात हे प्रकरण आल्याने सर्व भिंग फुटले. या प्रकरणी चारही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cop forges inspectors sign to issue fake carecter certificates