समांतर जलवाहिनी प्रकल्पात मोठा अपहार झाला असून, या भ्रष्टाचारात सहभागी लोकप्रतिनिधींची नावे महापालिकेच्या सभागृहात जाहीर करावीत, ही मागणी सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांनी लावून धरली आणि महापौर कला ओझा यांनी सभाच गुंडाळली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आधी महत्त्वाच्या विषयांवर की, विषयपत्रिकेनुसार चर्चा करायची, यावरून झालेल्या गदारोळात  विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी रिमोट कंट्रोलचा महापौर असा उल्लेख करीत निषेधाच्या घोषणा दिल्या.
महापालिकेच्या सभेत सुरुवातीला भारिप-बहुजन महासंघाचे नगरसेवक अमित भुईगळ यांनी सलीम अली सरोवर परिसरात गौतम बुद्धाचा पुतळा बसवावा व त्यासाठी ५० लाखांची तरतूद करावी, अशी लेखी विनंती करूनही हा ठराव सर्वसाधारण सभेत न ठेवल्याबद्दल ध्वनिक्षेपक उचलून फेकले. त्यांना सर्व पक्षांच्या सदस्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. हा विषय मार्गी लागतो तो न लागतो तोच महत्त्वाच्या मुद्यांवर आधी चर्चा करायची की, विषयपत्रिकेनुसार कामकाज करायचे, यावरून गदारोळाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे नगरसेवक काशिनाथ कोकाटे यांनी सभागृहात येतानाच काळा शर्ट घातला होता. त्यावर वेगवेगळ्या मागण्या लिहिल्या होत्या. आधी चर्चा घ्यायला हवी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. त्याला विरोधी पक्षातील सदस्यांनी उचलून धरले. या कारणामुळे सर्व सदस्य महापौर आसनासमोरील मोकळ्या जागेत आले. काहींनी तेथेच ठाण मांडले. काही जण बसून राहिले. नगरसेवक कुरेशी तर, चर्चा सुरू होत नाही तोपर्यंत उठणार नाही. सभागृहाने निलंबित केले तरी चालेल, असे म्हणत होते. गदारोळात कोण काय बोलत आहे, हे कळत नाही. जागेवर बसून विषय मांडावेत, असे वारंवार सांगितले जात होते. मात्र, त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. नंतर कामकाज सुरू झाल्यावरही गदारोळ कायम राहिला. मात्र, यानंतरही समांतर जलवाहिनीचा मुद्दा नगरसेवक मिलिंद दाभाडे जोरकसपणे मांडत होते. गदारोळातच सभागृहाचे कामकाज गुंडाळण्यात आले. त्यानंतर महापौर कला ओझा रिमोट कंट्रोलने कामकाज चालवतात. पदाधिकारी व महापौर हुकूमशाही वृत्तीने काम करीत आहेत, असा आरोप दाभाडे यांनी केला. समांतर जलवाहिनीच्या प्रकरणात खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी गैरव्यवहार केला असल्याचा आरोप दाभाडे यांनी केला.