महापालिकेच्या उपायुक्त (कर) स्मिता झगडे यांच्या पाठोपाठ आता उपायुक्त (प्रशासन) डॉ. महेश डोईफोडे हेही बदलीच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे कार्यकाल पूर्ण न करताच नगरमधून बदली करून घेण्याची मनपा अधिकाऱ्यांची परंपरा कायम आहे.
गेले सलग ३ महिने उपायुक्त श्रीमती झगडे रजेवर आहेत. ३१ जानेवारीला संपलेली रजा त्यांनी अर्जाद्वारे आणखी २ महिने वाढवून घेतली आहे. श्रीमती झगडे नगरच्याच आहेत. त्यामुळे त्या बदलीचा प्रयत्न करणार नाहीत असा मनपा वर्तुळाचा अंदाज होता. मात्र त्यांचेही येथे बिनसले आहे. आपली नियुक्ती उपायुक्त (प्रशासन) अशी असताना आपल्याला उपायुक्त (कर) असा कार्यभार देण्यात आला अशी त्यांची तक्रार असून ज्यावर नियुक्ती झाली तोच कार्यभार द्यावा अशी मागणी आहे.
रुजू होतानाच त्यांनी तत्कालीन आयुक्तांना कर विभागाचा कार्यभार घेणार नाही स्पष्ट केले होते. मात्र नंतर पाहू म्हणून त्यांची समजूत घालण्यात आली. त्यांच्या काही काळ आधी नियुक्त झालेल्या उपायुक्त डॉ. डोईफोडे यांच्याकडे सुरूवातीला उपायुक्त (कर) असाच कार्यभार होता. त्यानंतर उपायुक्त (प्रशासन) कार्यभार असलेले अच्यूत हांगे यांची बदली झाल्यामुळे ते पद रिक्त झाले. त्यामुळे डॉ. डोइफोडे यांना तो कार्यभार देण्यात आला.
आयुक्त हे प्रशासनाचे प्रमुख असतात व तेच कोणाला कोणता कार्यभार देतात याचा निर्णय घेतात, त्यांच्या आदेशाप्रमाणेच या पदावर काम करत आहोत असे डॉ. डोईफोडे यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मागणी असूनही उपायुक्त श्रीमती झगडे यांना प्रशासन विभागाचा कार्यभार मिळत नव्हता. वाट पाहून अखेरीस त्या दिर्घ रजेवर गेल्या. त्याही नगरमधून बदली करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. आता डॉ. डोईफोडेही त्याच प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली.
आज डॉ. डोईफोडे अचानक मुंबईला गेल्यामुळे या चर्चेला जोर आला आहे. गेल्या काही दिवसात मनपाचे वातावरण बरेच गढूळ झाले आहे. पारगमन कर वसुलीचा ठेका, रस्त्यांची तसेच अन्य काही मोठय़ा योजनांची कामे यातून डॉ. डोईफोडे यांचे काही पदाधिकाऱ्यांबरोबर वारंवार खटके उडत आहेत. त्यातच माहितीच्या अधिकारात अर्ज करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर बेताल आरोप करण्यास सुरूवात केली आहे.  त्यामुळे मनपात बाहेरून आलेले सर्वच अधिकारी अस्वस्थ असून त्यातील अनेकजण बदली करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यात आता डॉ. डोईफोडेंची भर पडली आहे.