मुंबईसह पुणे, हैदराबाद येथे चोऱ्या करणारा एकेकाळचा राज्य पातळीवरील मुष्टीयोद्धा पंचाक्षरी स्वामी उर्फ जेम्स ऊर्फ बॉक्सर हा महागडे कपडे आणि बूट घालूनच चोरी करीत होता. त्यामुळे कुठल्याही सोसायटीत त्याला थांबवले जात नव्हते आणि त्यामुळे चोरी करणे सोपे झाल्याचे त्यानेच पोलिसांना सांगितले आहे. या चोरीच्या पैशातूनच त्याने ७० लाख रुपये किमतीचा महागडा मूव्ही कॅमेरा घेतला होता. हा कॅमेरा भाडय़ाने देऊन पैसे कमावण्याचा त्याचा हेतू होता. परंतु त्याआधीच तो पकडला गेला. प्रामुख्याने दिवसा आपण चोरी करीत होतो. मुंबई, पुणे, हैदराबाद येथे बहुसंख्य दाम्पत्य कामावर जातात आणि त्यांची मुले दिवसभर शाळेत असतात, याची माहिती असलेला बॉक्सर चोरीसाठी अशीच घरे निवडत होता. ज्या सोसायटीत पहारेकरी वा सीसीटीव्ही नाहीत, अशाच सोसायटींची तो निवड करीत असे. महागडे कपडे आणि बूट घालून, महागडी बॅग कमरेत अडकवून तो सोसायटीत प्रवेश करीत असे. जवळ असलेल्या कटरच्या सहाय्याने कुलूप वा लॅच तोडून घरातील फक्त रोख आणि सोन्याचे दागिने तो चोरत असे, असे पोलिसांनी सांगितले. सोसायटीत येण्यासाठी तो कूल कॅबचा वापर करीत असे, असेही सूत्रांनी सांगितले.
महागडय़ा गाडय़ा वापरण्याचाही त्याला छंद होता. महागडय़ा गाडय़ांमध्येच तो बिनधास्तपणे चोरीचा ऐवज ठेवत असे. या गाडय़ांची तपासणी होत नसल्यानेच आपण तो मार्ग अवलंबिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. गुन्हे विभागाचे सहआयुक्त हिमांशू रॉय व अतिरिक्त आयुक्त निकेत कौशिक यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे अधिक तपास करीत आहेत.