वेगवेगळ्या तडजोडीमुळे अतिशय चुरशीच्या ठरलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ९७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मनसेने भाजपसमवेत तर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सहमतीचे राजकारण केल्याचे अधोरेखीत झाले. या राजकीय डावपेचांत कोणाची सरशी झाली, याची स्पष्टता मंगळवारी मतमोजणीनंतर होणार आहे.
जिल्हा नियोजन समितीत जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २५ जागांची निवड यापूर्वीच झाली आहे. महापालिकेच्या १३ आणि नगरपालिकांची एक अशा १४ जागांसाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. १४ जागांसाठी एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. महापालिका निवडणुकीसाठी २०८ तर नगरपालिकांसाठी १६४ मतदार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी दिली. मतदान प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात शांततेने पार पडली. नाशिक व मालेगाव महापालिकेत शिवसेना-रिपाइंचे ३४, तिसरा महाजचे २३, भाजप १४, मनसे ४०, जनता दल ४, काँग्रेस ४०, राष्ट्रवादी काँग्रेस ३१, मालेगाव विकास आघाडी ४, अपक्ष ६, जनराज्य आघाडी ३, माकप तीन असे बलाबल आहे. मालेगावमध्ये तिसरा महाजला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून परस्परांना मदत करण्याचे धोरण निश्चित केल्याचे सेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी नमूद केले. निवडणुकीची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने पक्षांच्या अनेक नेत्यांनाही त्यासंदर्भात निश्चित अशी माहिती देता येत नव्हती. युती झाल्यावर खुल्या प्रवर्गातील महिला-पुरूष गटासाठी प्रत्येकी चार जागा असून त्यासाठी ५१ मतांचा कोटा आहे तर मागासवर्गीय प्रवर्गाच्या प्रत्येक दोन जागांसाठी १०१ मतांचा कोटा येईल. या अनुषंगाने चर्चा करून कोटय़ानुसार तोडगा काढण्यात आल्याचे करंजकर यांनी नमूद केले. मतदानापूर्वी तिसरा महाज, मनसे आणि भाजपची आघाडी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु, तिसरा महाजशी मनसे व भाजपचे सूत काही जुळले नाही. नाशिक महापालिकेत मनसेची भाजपशी युती आहे. मनसे व भाजप या निवडणुकीसही एकत्रित सामोरे गेल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी सांगितले. आम्ही युतीचा धर्म पाळला आहे. भाजपच्या डॉ. राहुल आहेर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय मनसेचे सुरेखा भोसले, शीतल भामरे व सलीम शेख असे चार उमेदवार रिंगणात असून ते विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी काँग्रेस आघाडीचा नगरपालिका निवडणुकीतील आमचा एकमेव उमेदवार सचिन दराडे विजयी होईल, असा दावा केला. महापालिका गटात राष्ट्रवादीने मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी सेनेची मदत घेतल्याचे दिसत आहे.