शहरातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पालिकेच्या रूग्णालयासह आरोग्य केंद्रावर अनेक औषधांचा तुटवडा असताना वैद्यकीय विभागातील अनेक अधिकारी दलालांच्या मार्फत लक्ष्मीदर्शन करण्यात व्यस्त आहेत. आरोग्य विभागातील दोन प्रमुख दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून खंडणीचे गुन्हे दाखल झाले असून यात त्याच बरोबर एका खाजगी व्यक्तीचा देखील सहभाग असल्याने वैद्यकीय विभागातील दलालांच्या वावर असल्याचे स्पष्ट करणारे आहे. मुख्यत: कोणाचीही भीडमुर्वत न ठेवता काम करण्यात प्रसिद्ध असलेले महापालिकेचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी वैद्यकीय विभागाची स्वच्छता मोहिम हाती घ्यावी अशी अपेक्षा प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या टक्केवारी कार्यपद्धतीवर नेहमीच टिका होत राहिली. तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी देखील अनेकदा टक्केवारीच्या मुद्दय़ावरून अधिकाऱ्यांना फटकारले होते. महापालिकेच्या आयुक्त पदाची जऱ्हाड यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांच्या या मनोवृत्ती जरब बसेल असा विश्वास सर्व सामान्य नवी मुंबईकराकडून व्यक्त होत होता. मात्र तोही फोल ठरताना दिसत आहे. शहरातील महापालिका रूग्णालयात अनेक औषधांचा तुटवडा आहे. सापाचे विष उतरविण्यासाठी आवश्यक असलेल्या लसींचा सध्या पुरसे साठी उपलब्ध नाही, करोडो रूपये खर्च करून घेतलेले फिरते रूग्णालय सध्या धुळ घात पडलेले आहे. निविदा प्रक्रिया उशीराने होते असल्याने अनेक महत्वाची कामे रखडली आहेत. याच बरोबर औषधासंदर्भातील निविदा प्रक्रिया पुर्ण होवून ही ती उघडण्यात न आल्याने आठवडा भरात औषधांचा अधिक तुटवडा जाणवण्याची भिती व्यक्त होत आहे. महापालिकेने नेरूळ आणि बेलापूर येथे सुरू केलेल्या रूग्णालयातील अंतर्गत कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य नसल्याने फक्त बाह्य़कक्ष कार्यान्वयीत आहेत. यामुळे रूग्णाची वाताहत होत असताना , सध्या वैद्यकीय विभागातील अधिकारी नव्या वादात अडकले आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परोपकारी आणि डॉ. रत्नप्रभा पुकार यांच्यावर खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात दलालाची भूमिका बजाविणाऱ्या नेरूळ येथील सुरेश भानुशाली याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐरोली येथील डॉ. मंगेश वास्ते यांनी रूग्णालय सुरू करण्या प्रकरणी आवश्यक असलेली परवानगीसाठी वैद्यकीय विभागाकडे अर्ज केला होता. मात्र बराच कालावधी लोटून आणि सर्व कागदपत्राची पुर्तता करून ही परवानगी मिळत नसल्याने महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. यात परोपकारी आणि पुकार यांनी दमदाटी करीत २० हजारांची मागणी वास्ते यांच्याकडे केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. पैसे न दिल्यास विनापरवाना रूग्णालय सुरू केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचे वास्ते यांनी सांगितले. या प्रकरणी बेलापूर न्यायालयात डॉ. वास्ते यांनी दाद मागितल्यानंतर न्यायालयाने या तिघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. यानुसार एनआरआय पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे या गुन्हाचा अधिक तपास करीत आहेत. या घटनेने अनेक प्रश्न चिन्ह निर्माण केले आहेत. या बाबात वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांच्याशी संपर्क साधला असता , या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली असून २५ नोव्हेबरला त्याची सुनावणी असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात पालिकेचे आयुक्त बाबासाहेब जऱ्हाड यांच्याशी संपर्क साधला असता आरोग्य विभागातील मुख्य अधिकाऱ्यांची लवकरच बैठक बोलविण्यात येणार असून आरोग्य विभागाचा कारभार अधिक गतिमान करण्याकडे लक्ष देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.