मध्य रेल्वेच्या मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान पाच आणि सहा या दोन नवीन रेल्वे लाइन टाकण्याच्या कामाचे पैसे घेऊन ते उपठेकेदाराला दिले नसल्याप्रकरणी मुख्य ठेकेदाराविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, या वादामुळे नवीन रेल्वे रुळाचे काम रखडले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
शाम नारायण ब्रदर्स कंपनीचे मालक सुनील उपाध्याय याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याचे मुंब्रा स्थानक परिसरात कार्यालय आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान पाच आणि सहा या दोन नवीन रेल्वे लाइन टाकण्याचे काम हाती घेतले असून या कामाचा ठेका सुनील उपाध्याय याला दिला होता. मात्र, त्याने हे काम सुनील वसंत पाटील यांना दिले होते. उपाध्याय याने प्रशासनाकडून कामाचे पैसे घेऊन ते सुनील पाटील यांना दिले नाहीत. याशिवाय त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुनील पाटील यांनी या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार उपाध्याय याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.