एका खूनप्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले व भाजपचे नगरसेवकपद रद्दबातल ठरलेले अनंत ज्ञानेश्वर जाधव हे पुण्याचा येरवडा कारागृहातून १५ दिवसांच्या पॅरोलवर (अभिवचन रजा) आले होते. परंतु रजा संपल्यानंतरही ते पुन्हा कारागृहात हजर न झाल्याने त्यांचा विरुद्ध सोलापूरच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनंत जाधव हे प्रभाग क्र.७ ब मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. दरम्यान, एका दलित तरुणाच्या खूनप्रकरणात सोलापूरचा सत्र न्यायालयाने जाधव यांना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात झाली असताना ते गेल्या २५ सप्टेंबर २०१३ ते १० ऑक्टोबर २०१३ अशा १५ दिवसांच्या अभिवचन रजेवर आले होते. परंतु नंतर ते हजर न झाल्याने त्यांच्या विरुद्ध कारागृहाचे तुरुंगरक्षक राहुल भोसले (पुणे) यांनी फिर्याद दाखल केली.