यंदाच्या २७ व्या क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धेस १९ जानेवारीस वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात सुरुवात होत आहे. स्पर्धा ट्वेंटी-२० पद्धतीने खेळवली जाणार आहे.
जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आ. अरुण जगताप व क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीचे सरव्यवस्थापक विजय लेले यांनी ही माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही विजेते, उपविजेते, प्रत्येक शतकवीर, सामन्यात पाच विकेट घेणाऱ्या गोलंदाजास, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रत्येक सामन्यासाठी गिफ्ट कूपन दिले जाईल.
स्पर्धेची माहिती व नियमावली प्रवेश अर्जासोबत दिली जाईल. एकूण ३२ संघांना प्रवेश दिला जाईल. मागील वर्षीच्या स्पर्धेत कमीत कमी दोन सामने जिंकणाऱ्या संघास, कंपन्या, सरकारी संस्था, शालेय संस्था यांना प्राधान्य राहील. एका तालुक्यातून एकाच संघास प्रवेश आहे.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनी धिरेंद्रसिंह (९८९००४४०९०), दत्ताजी भोसले (९९२२४५०२०५) किंवा जगदीश पाडलेकर (९२२६९४२०७६) यांच्याकडे किंवा कंपनीच्या एमआयडीसी कार्यालयात १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेचे सचिव संजय बोरा, कंपनीचे प्रदिप आरोटे यांनी
केले.
वर्षभरात ‘मातीत गेली’ कूपनलिका
मागील स्पर्धेच्या वेळी क्रॉम्प्टन कंपनीने वाडिया पार्कमध्ये पाण्याच्या व्यवस्थेसाठी कूपनलिका खोदून संकुल समितीकडे दिली, त्यासाठी सुमारे ७० हजार रु. खर्च केला. काही दिवसांतच कूपनलिका बुजली. स्पर्धेच्या आयोजनासाठी कंपनीने आज मैदानाची पाहणी केली, त्यांना कूपनलिका बुजलेली आढळली, त्यांनीच ती पुन्हा स्वच्छ व दुरुस्त केली. मैदानात अंधार होतो म्हणून चालण्याचा व्यायाम करणाऱ्यांच्या सुविधेसाठी यंदा कंपनी दिव्यांची व्यवस्था करणार असल्याचे समजले. हे दिवे तरी पुढील स्पर्धेपर्यंत सुरु रहावेत, त्याची गत कूपनलिकेसारखी होऊ नये याची काळजी संकुल समितीने घ्यावी अशीच क्रिकेटप्रेमींची मागणी राहील.