गांजाची तस्करी करणाऱ्या आंध्र प्रदेशमधील दोघा तरुणांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी मिरज न्यायालयाने दिले. पोलिसांनी सोमवारी या दोघांकडून ४ किलो गांजा जप्त केला होता.
मिरजेच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिवाजी पुंडलिक चव्हाण व राजू उमासिंग पवार (वय २०, रा. रवचगुत्ती, गंगाराम तांडा, नारंग खेड, जि. मेदक) या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता ४ किलो गांजा मिळून आला. हे दोघे आंध्र प्रदेशातून गांजाची तस्करी करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाणे अमली पदार्थाची जपणूक व वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरज पोलिसांनी आरोपी शिवाजी चव्हाण व राजू पवार या दोघांना आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोघांची दि. १० सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.