अयोग्य प्रकारे केलेल्या छाटणीमुळे संपूर्ण वृक्षाचेच आयुष्य धोक्यात येत असल्याने केवळ पालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडूनच वृक्षछाटणी करून घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. पालिकेने घेतलेल्या या पुढाकारामुळे लाकूड मिळवण्यासाठी अयोग्य प्रकारे केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीला आळा बसू शकेल.
पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांची छाटणी पालिकेकडून केली जाते. वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी त्यांची समतोल भागात छाटणी करणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा झाडांची एकाच बाजूने अशास्त्रीय पद्धतीने छाटणी केल्याने झाडे कोसळण्याचा, उन्मळून पडल्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे काही फांद्या छाटण्यास बोलावलेला कंत्राटदार मोठय़ा फांद्याच्या विक्रीच्या आशेने झाडाचा पार बुंधा कापत जातो. या दोन्ही समस्यांवर मात करण्यासाठी पालिकेने यावर्षी नवीन योजना लागू केली आहे. या वर्षीपासून पालिकेकडून वृक्षछाटणी योग्य पद्धतीने करण्यासाठी तसेच वृक्षांसंबंधीची सर्व कामे योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी कंत्राटदारांनी नियुक्ती करण्यात आली आहे. मृत झाडांचे निर्मूलन, धोकादायक झाड तोडणे, अनावश्यक फांद्याची छाटणी, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनरेपण, झाडांमधील ढोली व पोकळ्या भरणे, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे तसेच कीटकनाशके फवारणे अशा कामांसाठी पालिकेने दर निश्चित केले आहे. वॉर्ड कार्यालयातील उद्यान खात्यात अर्ज केल्यावर संबंधित अधिकारी झाडाची पाहणी करतील व त्यानंतर सात दिवसात नमूद कामे केली जातील.